पनवेल नगरपालिकेतर्फे बांधण्यात आलेलं ‘क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके’ नाटय़गृह एक जून या दिवशी रसिकांसाठी खुलं होत आहे. सातशे आसनक्षमता असलेलं हे वातानुकूलित नाटय़गृह आधुनिक सोयींनी सज्ज असून या निमित्ताने पनवेलकरांची प्रदीर्घ काळापासूनची एक इच्छा फलद्रुप होईल. अर्थात, हे काही पनवेलमधील पहिलं नाटय़गृह नाही..
पनवेलमधील बहुसंख्य नाटय़प्रेमींना अगदी ज्येष्ठ नागरिकांनाही उपरोक्त विधान वाचून आश्चर्याचा धक्का बसेल. यापूर्वी पनवेलमध्ये नाटय़गृह नव्हतंच, मग नव्याने बांधण्यात आलेलं हे नाटय़गृह पहिलंवहिलं कसं नाही बुवा, असा प्रश्न अनेकांच्या मनात येईल. मात्र गोष्टही तशी जुनीच आहे. बोलपटांचा काळ सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्रात किर्लोस्कर, देवल, खाडिलकर, बालगंधर्व यांच्या नाटक कंपन्या संगीतनाटकांच्या माध्यमातून रसिकरंजन करत होत्या, गावोगावी फिरून नाटकांचे खेळ करत होत्या, त्यास पनवेलचाही अपवाद नव्हता. होय, संगीत नाटकांच्या त्या सुवर्णकाळात पनवेलमध्येही नाटकांचे नियमित खेळ होत असत, तेही गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका नाटय़गृहात. अगदी अजूनही ती वास्तू अनेक पावसाळे सोसून उभी आहे. आता फार न ताणता एक क्लू देतो. ही वास्तू कालांतराने प्रसिद्ध सिनेमागृह म्हणून नावारूपाला आली. एव्हाना अनेकांच्या लक्षात आलं असेल, की ही वास्तू दुसरी-तिसरी कोणती नसून ‘रतन टॉकीज’ आहे. तरीही एक प्रश्न उरतोच, ‘टॉकीज’ आणि नाटय़गृहाचा काय बरं संबंध, उत्तर सोपं आहे. ‘रतन टॉकीज’ं आधी नाटय़गृह या नात्याने अस्तित्वात होतं. या नाटय़गृहाचं नावही सांगून टाकतो. तर ही वास्तू ‘श्री गोपाळकृष्ण नाटय़गृह’ या नावाने ख्यातकीर्त होती आणि त्याची मालकी पेशव्यांचे पनवेलचे प्रतिनिधी असणाऱ्या बापट परिवाराकडे होती.
बापटांनी हे नाटय़गृह नेमकं कधी उभारलं, याची नोंद आज कदाचित उपलब्ध नसेल. मात्र सध्याच्या लोकमान्य टिळक पथावर पक्क्या बांधकामाचं व पत्र्यांचं छप्पर असलेलं हे नाटय़गृह तेव्हा दिमाखात उभं होतं, त्या वास्तूला बालगंधर्वाचेही पाय लागले होते व त्यांचे लडिवाळ स्वरही तेथे गुंजले होते, यात शंका नाही. बापट परिवारातील दोन अतिज्येष्ठ सदस्य या नोंदींना पुष्टी देतात. सुमती पाटणकर या आजी (की पणजी?) सध्या ९० वर्षांच्या आहेत, त्या पूर्वाश्रमीच्या येसुताई बापट. तसेच ८६ वर्षांचे माधव गोपाळकृष्ण ऊर्फ अण्णासाहेब बापट हे बापट परिवारातील सर्वात ज्येष्ठ सदस्य आहेत. हे दोघंही वयोमानानुसार थकले असले तरी त्यांची स्मरणशक्ती शाबूत आहे. तो सुवर्णकाळ त्यांनी अनुभवला आहे. ते दोघं सांगतात, ‘श्री गोपाळकृष्ण नाटय़गृह’ नेमकं कधी सुरू झालं, हे आम्हालाही ठाऊक नाही. आम्ही तेव्हा खूपच लहान होतो. आमच्या जन्मापूर्वी ते बांधलं होतं, यात शंका नाही. तरीही लहानपणी तेथे अनेक नाटकं पाहिल्याचं आजही स्मरतं. अगदी ‘सौभद्र’ आणि ‘मानापमान’सारख्या गाजलेल्या नाटकांचे प्रयोगही तेथे अनेकदा झाल्येत. हे एवढय़ापुरतंच नव्हतं, तर प्रत्येक नाटकातल्या सर्व कलाकारांची, वादकांची निवासाची व्यवस्था आमच्याच बापट वाडय़ात केली जात असे. त्यांच्या वेशभूषेचे मोठे पेटारेही आमच्याच वाडय़ात असत. अगदी कालपरवापर्यंत हे पेटारे चांगल्या अवस्थेत होते. हे नाटय़गृह १९३५मध्ये बंद पडलं आणि पुढे आमच्या पूर्वजांनी ते बांठियांना विकलं, त्यांनी त्याच वास्तूत ‘रतन टॉकीज’ बांधलं..
बापट परिवारातल्या या अतिज्येष्ठ सदस्यांकडून पनवेलच्या पहिल्या नाटय़गृहाबाबत मिळालेली माहिती कमालीची रोमांचक वाटली. संगीत रंगभूमी ऐन भरात असताना मोठमोठय़ा कलाकारांना ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्याचं भाग्य त्या पिढीला लाभलं. दुर्दैवाने पुढच्या अनेक पिढय़ा त्यापासून वंचित राहिल्या. मुंबईचं प्रवेशद्वार असणाऱ्या पनवेलसाठी नाटय़गृह म्हणजे स्वप्नरंजनच ठरलं. याला राजकारण्यांची अनास्थाच कारणीभूत होती. पनवेलमधील एक रंगकर्मी चंद्रशेखर सोमण यांच्या पुढाकाराने के. वि. कन्या विद्यालयाच्या सभागृहात ‘नाटय़बहार रजनी १९८६’चं आयोजन करण्यात आलं होतं, तेव्हाची गोष्ट आहे. त्या रजनीचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे होते, ज्येष्ठ गायक-नट भालचंद्र पेंढारकर. अगदी रंगात आलेल्या त्या कार्यक्रमात पनवेलमधील एका थापाडय़ा नेत्याने घोषणा केली की ‘लवकरच आम्ही पनवेलमध्ये नाटय़गृह उभारणार..’ टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला, मायबाप रसिकांना ते खरंच वाटलं. प्रत्यक्षात पुढे काहीच झालं नाही. आडातच नव्हतं तर पोहऱ्यात कुठून येणार.. त्यानंतर अनेक वर्षांनी शेकापचे तत्कालीन नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे आणि काँग्रेसचे तत्कालीन नगराध्यक्ष व विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यकाळात नाटय़गृहाच्या कल्पनेला, योजनेला चालना मिळाली. ही मधली र्वष मात्र नाटय़वेडय़ांसाठी फारच भयंकर होती. नाटकांना मोठा प्रेक्षकवर्ग आहे, हे ध्यानात घेऊन काही ठेकेदार वि. खं. विद्यालयाच्या पटांगणात नाटकं आयोजित करत, एका रेषेत लावलेल्या खुच्र्यामध्ये बसून तेथे नाटक पाहणं म्हणजे दिव्यच असे. शेजारी बल्लाळेश्वर तलाव असल्याने या पटांगणात रात्री नाटक पाहताना डास मारण्याचंच काम मोठं असे. त्यातच एवढी मोठी शाळा असून चांगली प्रसाधनगृह नसल्याने प्रेक्षकांची व विशेषत: महिलांची फारच कुचंबणा होत असे. चढय़ा दरांबाबत तर बोलायची सोय नाही. मुंबईच्या तुलनेत दुप्पट दराने तिकिटं घ्यावी लागत आणि नाटकांतील कलाकारही असे लबाड की ‘आजचा प्रयोग काय पनवेलसारख्या गावात आहे, तेव्हा कापा प्रसंग, पळवा नाटक आणि संपवा दुसरा अंक..’
ही परिस्थिती काहीशी बदलली ती वाशीत ‘विष्णुदास भावे नाटय़गृह’ सुरू झाल्यानंतर, म्हणजे साधारण पंधरा वर्षांपूर्वी. तरीही आगाऊ तिकिटं काढा, बस पकडून वाशी गाठा असा सोपस्कार करावा लागे. नाटक संपल्यानंतर पुन्हा गाडी पकडून पनवेल गाठायचंय ही भावना मनाच्या एका कोपऱ्यात असल्याने नाटक पाहताना काहीसा रसभंग होत असे.
पनवेलमधील नाटय़वेडय़ांच्या अनेक पिढय़ांनी सोसलेलं हे सांस्कृतिक कुपोषण या नव्या नाटय़गृहाच्या निमित्ताने संपेल, अशी आशा आहे.
(हे नवं नाटय़गृहही पूर्वी बापट परिवाराचीच मालकी असलेल्या कृष्णाळे तलावाच्या भरावावर होत आहे, हा आणखी एक योगायोग!) मात्र हे नाटय़गृह सांस्कृतिक केंद्र याच नात्याने नावारूपाला यावं, त्याचा राजकीय अड्डा होऊ नये, तेथे लग्न, खासगी पाटर्य़ा आयोजित केल्या जाऊ नयेत, अशी माफक अपेक्षा आहे.
पनवेलच्या परिसरात गेल्या काही वर्षांत एक मोठाच नवश्रीमंत वर्ग निर्माण झाला आहे. या मंडळींनी पहिल्या रांगेत बसून आपापल्या महागडय़ा स्मार्ट फोनचे िरगटोन कलाकारांना ऐकवू नयेत, अशीही अपेक्षा आहे.
मंडळी, आता केवळ तिसरी घंटा वाजायचा अवकाश आहे. नंतर पडदा दूर होईल आणि हे नाटय़गृह म्हणेल, रसिकहो, घ्या इथे विश्रांती.
रसिकहो, घ्या इथे विश्रांती
पनवेल नगरपालिकेतर्फे बांधण्यात आलेलं ‘क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके’ नाटय़गृह एक जून या दिवशी रसिकांसाठी खुलं होत आहे.
First published on: 25-05-2014 at 04:48 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Krantiveer vasudev balwant phadke natyagruha panvel