‘रांझणा’ चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक आनंद एल रॉय आणि अभिनेता धनुष यांची जोडी आणखी एक रोमँटीक ड्रामा ‘तेरे इश्क में’ चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटात धनुषबरोबर मुख्य भूमिकेत अभिनेत्री क्रिती सेननसुद्धा दिसणार आहे. नुकताच क्रितीचा या चित्रपटातील पहिला व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

“जिथे प्रेमासाठी मनात उत्कटता असते तिथे कथा वेगळी असते”, अशा कॅप्शनसह व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये सुरूवातीलाच जाळपोळ आणि दंगल सुरू असल्याचं दिसत आहे. अनेक व्यक्ती हातात लाठ्या काठ्या घेऊन एकमेकांवर धावून येत आहेत. तसेच क्रिती हातात रॉकेल घेऊन या दंगलमधून वाट काढत पुढे चालली आहे.

व्हिडीओमध्ये पुढे “तुझं माझ्यावर प्रेम आहे हे मला माहिती आहे. मात्र, हे प्रेम माझ्याही मनात असावं हे गरजेचं तर नाही. तू रागात संपूर्ण शहर डोक्यावर घेतलंस तरी त्याचं दु:ख मलाही व्हावं हे गरजेचं नाही. तुला होत असलेला त्रास मला घाबरवेल, पण त्या भीतीसमोर मी हार मानावी, हे गरजेचं तर नाही. तू मंदिरासमोर नतमस्तक होत असशील, पण त्याने तुला मुक्ती मिळेच असं नाही.”, असे डायलॉग क्रिती म्हणत आहे.

डायलॉग संपताच क्रिती हातातला रॉकेलचा डब्बा तिच्या डोक्यावर आणि अंगावर ओतून घेते. तसेच एका ठिकाणी बसते आणि ओठांमध्ये सिगरेट पकडते. त्यानंतर लायटर पेटवते आणि पुढे व्हिडीओ संपतो. ‘तेरे इश्क में’ या चित्रपटात क्रिती मुक्ती हे पात्र साकारणार आहे.

चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार?

‘तेरे इश्क में’ चित्रपटात धनुष शंकर हे पात्र साकारणार आहे. सोमवारी सोशल मीडियावर या चित्रपटातील धनुषचा पहिला व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यामध्ये धनुष हातात एक काचेची बॉटल घेऊन जाताना दिसत आहे. या बॉटलला समोरच्या बाजून आग लावण्यात आलीये. आग असलेली काचेची बॉटल तो पुढे एका भिंतीवर फेकतो. तसेच “प्रेमात फक्त मुलंच जीव देतात का? काही मुलीसुद्धा प्रेमात जीव देण्याची हिम्मत ठेवतात”, असा डायलॉग क्रितीच्या आवाजात ऐकू येतो. आनंद एल रॉय दिग्दर्शित हा चित्रपट २८ नोव्हेंबर २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader