बॉलिवूडमधल्या नवोदित चेहऱ्यांपैकी एक म्हणजे अभिनेत्री क्रिती सॅनॉन. २०१४ साली आलेल्या ‘हिरोपंती’ या चित्रपटातून तिने अभिनेता टायगर श्रॉफसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिच्या हसण्याने व मनमोकळ्या स्वभावाने ती कायमच प्रेक्षकांचे मन जिंकून घेते. हिरोपंती चित्रपटात तिने ‘डिम्पी’ ची व्यक्तिरेखा साकारली होती. टायगरसोबतच्या तिच्या केमिस्ट्रीचेही कौतुक झाले होते. याच भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर पुरस्कारही प्राप्त झाला होता. ‘बरेली की बर्फी’ ,’लुका छुपी’ अशा चित्रपटांमधून तिने कायमच अभिनयाची छाप पडली आहे.
बाहेरून येणाऱ्या कलाकारांना बॉलीवूडमध्ये आपले स्थान निर्माण करणे हेच मोठे आव्हान असते. हे आव्हान पेलण्यात यशस्वी ठरलेली सध्याची तरुण अभिनेत्री म्हणून क्रिती सॅनॉनकडे पाहिलं जातं. नुकत्याच एका मुलाखतीत क्रिती म्हणाली की, “बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांच्या मुलांसोबत मी स्वतःची तुलना कधीच करत नाही. मी स्वतः एका कलाकारांच्या मुलासोबतच सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. मला व टायगरला कायमच सामान पातळीवर वागवले गेले आहे. मी व टायगर या क्षेत्रात नवीनच होतो. आम्ही लहान मुलांप्रमाणे गोष्टी शिकत होतो. सुदैवाने, माझ्या दिग्दर्शक व निर्मात्यांनी आम्हाला सामान वागणूक दिली. त्यांनी कधीच मला फरक जाणवू दिला नाही. बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या दोन कलाकारांची कथा असंच प्रमोशन त्यांनी केलं.”
नुकताच क्रितीच्या ‘हिरोपंती’ चित्रपटाला पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहित तिने टायगरसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. ‘आपण एकाच नावेतून हा प्रवास सुरु केला होता. आपण सारखेच उत्साही होतो. मी तुझे वेड, शिस्त, मेहनत बघितली आहे. तुझी प्रगती बघून मला खूप आनंद होतो. माझ्या मनात तुझ्याविषयी कायमच खास जागा असेल.’ असे क्रितीने लिहिले आहे. आगामी ‘हाऊसफुल ४’, ‘पानिपत’ या चित्रपटांमध्ये क्रिती झळकणार आहे.