बॉलिवूड परफेक्शनिस्ट आमिर खान याचा ‘दंगल’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफीसवर धमाल करताना दिसत आहे. आमिरच्या प्रत्येक चित्रपटाची बॉलिवूड वर्तूळात आणि चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चा रंगते. त्यानुसार त्याचा आगामी चित्रपट देखील काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. बॉलिवूड दिग्दर्शक, निर्माता आदित्य चोप्रा अभिनयातील दोन हुकुमी एक्के अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांना घेऊन ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हा चित्रपट बनवत आहेत. या चित्रपटातून पहिल्यांदाच बिग बी आणि मिस्टर परफेक्शनिस्ट एकत्र काम करणार आहेत.मात्र, या चित्रपटातील अभिनेत्रीवरुन आमिर आणि आदित्य यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा रंगली होती. आदित्यला या चित्रपटाची अभिनेत्री वाणी कपूर असावी असे वाटत होते. तर आमिरने मात्र आलिया भट्ट हिला पसंती दिली होती. मुख्य अभिनेत्रीच्या मतभेदामुळे आमिर खान चित्रपटातून माघार घेणार असल्याची देखील चांगलीच चर्चा रंगली होती. पण या चित्रपटात वाणी कपूर आणि आलिया भट्ट या दोघींच्याही नावाची चर्चा थंडावली आहे.

‘हिरोपंती’ या चित्रपटाने बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी क्रिती सेनन आमिरसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार असल्याची चर्चा आहे. सध्या बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनन तिच्या आगामी ‘राबता’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती सुशांत सिंह राजपूतसह मुख्य भूमिकेत दिसणार आहे.  वाणी कपूर आणि आलिया भट्ट या दोन अभिनेत्रींच्या नावानंतर बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोडून टेलिव्हिजनवरील अभिनेत्रीच्या नावाची देखील चर्चा रंगली होती. ‘कुमकुम भाग्य’ या मालिकेने प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री मृणाल ठाकूर ही आमिरसोबत काम करताना दिसण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा या चित्रपटासाठी बॉलिवूडमधील चेहरा मिळाल्याचे कळते.

काही दिवसांपूर्वी बॉलिवू़ड अभिनेत्री क्रिती सेनन सुशांत सिंग राजपूत यांच्यासोबतच्या व्हायरल झालेल्या आक्षेपार्ह नृत्याच्या व्हिडिओमुळे  चर्चेत आली होती.  डिझायनर मनीष मल्होत्रा याच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये सुशांत आणि क्रितीने डर्टी नृत्य केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मनीष मल्होत्राच्या पार्टीमध्ये सुशांतसोबत कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह नृत्य केले नसल्याचेही क्रितीने म्हटले होते.