अभिनेत्री क्रिती सेनॉन स्टारर ‘मीमी’ चित्रपटाचं प्रेक्षक भरभरून कौतुक करतायेत. या चित्रपटात तिने सरोगेट मदरची भूमिका साकारलीय. यासाठी तिने तब्बल १५ किलो वजन वाढवलं होतं. त्यानंतर आता क्रिती सेनॉन वजन कमी करण्याच्या प्रयत्नात दिवस-रात्र मेहनत घेतेय. याचाच एक व्हिडीओ सध्या तिने सोशल मीडियावर शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये क्रिती वजन कमी करण्यासाठीचा व्यायाम करताना दिसून आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री क्रिती सेनॉनने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती वर्कआऊट करताना दिसून येत आहे. या व्हिडीओमधून तिने फॅट टू फिटची ट्रान्सफॉर्मेशन जर्नी शेअर केलीय. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरलाय. हा व्हिडीओ शेअर करताना तिने एक कॅप्शन देखील लिहिलीय. यात तिने लिहिलंय की, “मीमी चित्रपटासाठी १५ किलो वजन वाढवणं हे माझ्यासाठी एक मोठं आव्हान होतं. पण हेच १५ किलो वजन कमी करणं हे देखील काही सोप्प नव्हतं. पण ‘परम सुंदरी’ हे गाणं मी प्रतिक्षेत ठेवलं. त्यामुळेच मला वजन कमी करण्यासाठी प्रेरणा मिळत गेली.”

चित्रपटातील भूमिका आणि तिच्या वाढलेल्या वजनाबाबत बोलताना अभिनेत्री क्रिती सेनॉन म्हणाली, “सुरूवातीला वजन वाढवणं आणि त्यानंतर ३ महिने व्यायाम करून माझी सहनशक्ती, ताकद आणि संयम संपत चालला होता. खरं तर, माझ्या सांध्यांवर सतत जोर दिल्याने मला हळूहळू गतिशीलतेकडे परत यावं लागलं. लॉकडाउनच्या आधीचे आणि त्यानंतरचे काही निवडक व्हिडीओ शेअर करतेय. या ट्रान्सफॉर्मेशन जर्नीमध्ये मला यास्मिन चावलान हिने मदत केली.”

क्रिती सेनॉनच्या ‘मीमी’ चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर हा चित्रपट ‘मला आई व्हायचंय’ या मराठी चित्रपटाचा रिमेक आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. क्रिती व्यतिरिक्त अभिनेते पंकज त्रिपाठी आणि सई ताम्हणकर हे कलाकारही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kriti sanon was not easy to reduce her weight after gaining 15 kg sahre video prp