अभिनेता आणि चित्रपट समीक्षक केआरके म्हणजेच कमाल आर. खान सोशल मीडियावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असतो. २०२० मध्ये ऋषि कपूर आणि इरफान खान यांच्याबद्दल केलेल्या ट्वीटमुळे त्याला अटक झाली होती. याच दरम्यान त्याच्यावर एका नवोदित अभिनेत्रीशी गैरवर्तन करण्याच्या आरोपाखाली खटला देखील भरण्यात आला होता. पुढे काही दिवसांनी केआरकेची जामिनावर सुटका करण्यात आली. त्याने नुकतंच खळबळजनक ट्वीट करत बॉलिवूडवर टीका केली आहे.
जामिनावर सुटल्यानंतर केआरके लगेच सोशल मीडियावर सक्रिय झाला होता. त्याने सैफ अली खान आणि हृतिक रोशन यांच्या ‘विक्रम वेधा’ चित्रपटाबद्दल ट्वीट केले होते. यामध्ये त्याने “जर ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी बॉलिवूडचे लोक मला तुरुंगामध्ये टाकणार नसतील, तर मी या चित्रपटाचे समीक्षण नक्की करेन” असे म्हटले होते. त्यानंतर काही दिवसांनी त्याने ” मी ‘विक्रम वेधा’च्या समीक्षणानंतर चित्रपट समीक्षण करणं बंद करणार आहे” असे ट्वीट केले होते. केआरकेने सध्या ट्विटरच्या माध्यमातून बॉलिवूडवर पुन्हा निशाणा साधायला सुरुवात केली आहे.
त्याने केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. “माझ्याकडे आता फक्त २ पर्याय उरले आहेत. १. मुंबई सोडून जाणं. २. चित्रपटांचं समीक्षण करणं थांबवणं. मी या दोन पर्यायांपैकी दुसरा पर्याय निवडला आहे. मी जर समीक्षण करत राहिलो, तर राजकारण्यांचा पाठिंबा असलेले बॉलिवूडचे लोक माझ्याविरोधामध्ये पुन्हा नवे खटले भरवतील”, अशा शब्दांमध्ये केआरकेने बॉलिवूडवर गंभीर आरोप केले आहेत.
याआधीही केआरके त्याने केलेल्या वादगस्त वक्तव्यांमुळे अडचणीत सापडला होता. तो त्याच्या यूट्यूब व्हिडीओंमध्ये नवनवीन चित्रपटांचे समीक्षण करत असतो. मध्यंतरी ‘लाल सिंग चड्ढा’ या आमिर खानच्या चित्रपटावर समीक्षण केल्याने तो पुन्हा चर्चेत आला होता. त्याने हिंदी आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले आहे.