कॉमेडियन आणि अभिनेता कृष्णा अभिषेकला (Krushna Abhishek) डिझायनर शूज तसेच कपडे खरेदी करण्याचा छंद आहे, अलीकडेच अर्चना पुरण सिंगच्या घरी त्याने लंचला हजेरी लावली होती. अर्चना आणि कृष्णा यांनी यादरम्यान मारलेल्या गप्पांचा अर्चनाने व्लोग तयार करत तिच्या युट्युब चॅनलवर अपलोड केला आहे. या गप्पांच्या दरम्यान कृष्णाने महागड्या ब्रँडचे शूज कधीपासून जमा करायला सुरुवात केली हे सांगितले . यावर अर्चनाने खुलासा केला की कृष्णाने नुकताच ३ बीएचके फ्लॅट फक्त कपडे आणि शूज ठेवण्यासाठी खरेदी केला आहे.
अर्चना पूरण सिंगशी बोलताना कृष्णा म्हणाला, “मी लहानपणी माझे मामा गोविंदा यांचे कपडे घालायचो. त्यावेळी मला वाटायचं की DnG हा ब्रँड डेविड (धवन) आणि गोविंदा यांच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून तयार केला आहे.” त्याने पुढे सांगितले, “मी कॉलेजमध्ये असताना मामा मोठमोठ्या ब्रँडचे कपडे घालायचे. त्यावेळी आम्हाला ब्रँड्सबद्दल काहीही माहिती नव्हती, पण ते प्राडा, गुच्ची यांसारख्या ब्रँडचे कपडे घालायचे. मी त्यांचे DnG ब्रँडचे शर्ट आणि जॅकेट्स खूप वर्षं वापरले. खूप काळापर्यंत मला वाटायचं की DnG म्हणजे डेविड आणि गोविंदा यांच्या नावाचा ब्रँड आहे. मला वाटायचं की ते इतके प्रसिद्ध आहेत की त्यांनी स्वतःचा ब्रँड तयार केला असेल.” त्याकाळी गोविंदाचे चित्रपट दिग्दर्शक डेविड धवनबरोबर अनेक सुपरहिट चित्रपट आले होते.
कृष्णाने पुढे सांगितले की, त्याने शूज आणि कपड्यांचे कलेक्शन तयार केले आहे. “मी एक वेगळी प्रॉपर्टी खरेदी केली आहे आणि तिचे बुटीकमध्ये रूपांतर केले आहे.” अर्चना पूरण सिंगचे पती परमीत सेठी हे ऐकून चकित झाले. त्यावर अर्चनाने म्हटले, “हो, त्याने ३ बीएचके फ्लॅट फक्त कपडे आणि शूज ठेवण्यासाठी खरेदी केला आहे.” कृष्णा हसत म्हणाला, “मी दर सहा महिन्यांनी सगळ्या कपड्यांचे कलेक्शन बदलतो.” त्यावर अर्चनाने गंमतीने म्हटले, “माझा मुलगा आयुषमान तुझ्या उंचीचा आहे, त्यामुळे तू जेव्हा कपड्यांचे कलेक्शन बदलतोस तेव्हा आम्हाला दे.”
कृष्णाला ‘कॉमेडी सर्कस’, ‘द कपिल शर्मा शो’, ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ यांसारख्या रिअॅलिटी शोमुळे मोठी प्रसिद्धी मिळाली. तसेच त्याने ‘बोल बच्चन’, ‘एंटरटेनमेंट’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. तो त्याच्या विनोदी शैलीसाठी प्रसिद्ध आहे.