Miss World 2024 Winner: ७१वा ‘मिस वर्ल्ड २०२४’चा महाअंतिम सोहळा आज (९ मार्च) भारतात पार पडला. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेकशन सेंटरमध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. १९९७ साली ‘मिस वर्ल्ड’चं आयोजन भारतात करण्यात आलं होतं. तब्बल २८ वर्षांनंतर यंदा भारतात मोठ्या दिमाखात ‘मिस वर्ल्ड २०२४’चा महाअंतिम सोहळा झाला. चेक रिपब्लिकची क्रिस्टिना पिस्कोव्हा हिने ‘मिस वर्ल्ड २०२४’चा खिताब पटकावला (Miss world 2024 Krystyna Pyszkova). तर भारताचं प्रतिनिधित्व करणारी सिनी शेट्टी ही टॉप-८ पर्यंत पोहोचू शकली. त्यानंतर टॉप-४च्या शर्यतीतून बाहेर झाली.
‘मिस वर्ल्ड २०२४’च्या स्पर्धेच्या परीक्षणाची जबाबदारी १२ सदस्यांकडे होती. यामध्ये बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन, पूजा हेगडे, मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या सीईओ ज्युलिया एव्हलिन मॉर्ले, बँकर, गायिका व समाजसेविका अमृता फडणवीस, चित्रपट निर्माता साजिद नाडियाडवाला, माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग, पत्रकार रजत शर्मा, बेनेट, कोलमन अँड को. लिमिटेडचे डिरेक्टर विनीत जैन, मिस वर्ल्ड इंडियाचे चेअरमन आणि स्ट्रॅटेजिक पार्टनर, हॉस्ट जामिल सैदी यांचा समावेश होता. याशिवाय पूर्वाश्रमीच्या ३ ‘मिस वर्ल्ड’ विजेत्या देखील यात होत्या. ‘मिस वर्ल्ड २०२४’चा महाअंतिम सोहळ्याचे सूत्रसंचालन करण जोहर व ब्यूटी क्वीन मेगन यांग यांनी केलं. तसंच या सोहळ्यात शान, नेहा कक्कर, टोनी कक्कर परफॉर्म केलं.
हेही वाचा – ‘पारु’ की ‘शिवा’? कोणत्या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद? जाणून घ्या या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट
भारताचं प्रतिनिधित्व करणारी सिनी शेट्टी कोण?
सिनी शेट्टीच्या कुटुंबाची नाळ कर्नाटकाशी जोडली असली तरी तिचा जन्म २ ऑगस्ट २००१ साली मुंबईत झाला होता. सिनीची आजी राजघराण्यातली आणि आजोबा स्वातंत्र्यसैनिक होते. तिच्या वडिलांचं नाव सदानंद शेट्टी असून आईचं नाव हेमा शेट्टी असं आहे. तिला एक भाऊ देखील आहे; ज्याचं नाव शिकिन शेट्टी आहे. सिनीचे वडील हॉटेल व्यवसायात आहेत.
सिनीचं शालेय शिक्षण घाटकोपरच्या सेंट डोमिनिक सेवियो विद्यालयात झालं होतं. त्यानंतर तिने एसके सोमय्या कॉलेजमधून अकाउंटिंग आणि फायनान्समध्ये पदवी घेतली. ‘मिस वर्ल्ड २०२४’मध्ये सहभागी होण्यापूर्वी ती सीएफए (चार्टर्ड फायनेंशिअल अॅनालिस्ट)चं शिक्षण घेत होती. सिनी ही उत्कृष्ट भरतनाट्यम नृत्यांगना आहे. ४ वर्षांची असल्यापासून ती भरतनाट्यम शिकत असून वयाच्या १४व्या वर्षी तिला अरंगेत्रम मिळालं. ३ जुलै २०२२ रोजी सिनीने ३१ सौंदर्यवतींना मागे टाकून ‘मिस इंडिया २०२२’चा किताब पटकावला होता. पण यंदा ‘मिस वर्ल्ड २०२४’चा किताब पटकावण्याची संधी हुकली. सिनी टॉप-८ पर्यंत पोहोचली आणि टॉप-४च्या शर्यतीतून ती बाहेर झाली.