उत्तर प्रदेशमधील अत्तर व्यवसायिक पियूष जैनच्या घरावर मारलेला छापा आणि ते सापडलेली कोट्यावधींची संपत्ती सध्या देशभरामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. असं असतानाच आता हा सारा घटनाक्रम लवकरच मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. या सर्व प्रकरणावर चित्रपट बनवण्याची घोषणा नुकतीच करण्यात आळीय. उत्तर प्रदेशमधील कानपूर आणि कन्नोजमध्ये आयकर विभागाने केलेल्या छापेमारीवर चित्रपट निर्माता कुमल मंगत पाठक हे चित्रपट बनवणार आहेत. या चित्रपटाचं नाव ‘रेड-२’ असणार आहे. पाठक यांनी ही घोषणा पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या ‘काशी चित्रपट महोत्सवा’मधील एका पॅनल डिस्कशनदरम्यान केली. विशेष म्हणजे कुमार मंगत पाठक हेच अजय देवगणच्या ‘रेड’ या चित्रपटाचे निर्माते होते.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार निर्माता कुमार मंगत पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘रेड’ या चित्रपटामधून भितींमधूनही पैसे निघू शकतात असं दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला. मात्र कानपूर आणि कन्नौजमध्ये झालेल्या आयकर छापेमारीमध्ये खरोखरच भितींमधून पैसे निघाल्याचं पहायला मिळालं. त्याच पार्श्वभूमीवर पाठक यांनी आता ‘रेड-२’ बनवण्याचा निर्णय घेतल्या. या चित्रपटामध्ये भितींमध्ये पैसे लपवून ठेवल्याचं दाखवण्यात येईल असं पाठक म्हणालेत.
पाठक यांची निर्मिती असणारा ‘रेड’ या चित्रपटामध्ये अजय देवगण एक आयकर अधिकारी दाखवण्यात आला होता. तो एका नेत्याच्या घरी छापेमारी करतो. या चित्रपटामध्ये अभिनेत्री इलियाना डिक्रुझने अजयच्या पत्नीची तर सौरभ शुक्ला यांनी नेत्याची भूमिका साकारली होती. मात्र आता ‘रेड-२’मध्ये अजयच मुख्य भूमिकेत असेल की नाही याची काही घोषणा पाठक यांनी केलेली नाही.
नक्की वाचा >> “…अन् माझे जप्त केलेले पैसे परत करा”; २५७ कोटींचं घबाड सापडलेल्या पियूष जैनची न्यायालयात मागणी
आयकर आणि केंद्रीय अप्रत्यक्ष कर तसेच सीमा शुल्क बोर्डाने मागील काही दिवसांमध्ये केलेल्या छापेमारीमधे पियूष जैनच्या घरामध्ये २५७ कोटींची रोख रक्कम सापडली असून एकूण १६ संपत्तींसंदर्भातील माहिती मिळाली आहे. कारवाईदरम्यान काही कागदपत्रं सापडली असून यानुसार पियूष जैन यांच्याकडे १६ महागड्या संपत्ती आहे. यामधील ४ कानपूर, ७ कनौज, २ मुंबई आणि १ दिल्लीत आहे. विशेष म्हणजे दोन संपत्ती दुबईत असल्याचं समोर आलं आहे. त्याचबरोबर २३ किलो वजनाच्या सोन्याच्या विटा आणि बिस्कीटंही सापडलीय.
सध्या पियूष जैनला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. घरात सापडलेल्या सोनं हे परदेशातून आणल्याच्या त्यावर चिन्हांकित करण्यात आल्याने आता हे सोनं तस्करी करुन आणलं का याचा तपास महसूल गुप्तचर संचालनालयाकडे म्हणजेच डीआरआय करत आहे.