गेल्या काही दिवसांत मनोरंजन क्षेत्रातील अनेक जोडप्यांनी त्यांचे संबंध तोडल्याचे पाहायला मिळालं आहे. नुकतंच धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल वेगळे झाले. त्यानंतर आता यात आणखी एका जोडप्याची भर पडली आहे आणि हे जोडपं म्हणजे ‘कुमकुम भाग्य’ (Kumkum Bhagya) फेम अभिनेत्री मुग्धा चाफेकर (Mugdha Chaphekar) आणि तिचा पती रविश देसाई (Ravish Desai). मुग्धा चाफेकर व रविश देसाई एकमेकांपासून विभक्त झाले आहेत. रविश देसाईने त्याच्या सोशल मीडियाद्वारे मुग्धापासून विभक्त झाल्याची माहिती दिली आहे.
मुग्धा चाफेकर आणि रविश देसाई यांची २०१४ साली ‘सप्तरंगी ससुराल’ मालिकेच्या सेटवर ओळख झाली. याचदरम्यान त्यांच्यात प्रेम फुललं. दोन वर्षांनी २०१६ मध्ये जानेवारी महिन्यात त्यांनी साखरपुडा केला. मग त्याचवर्षी डिसेंबर महिन्यात दोघं लग्नबंधनात अडकले. आता ९ वर्षांचा संसार केल्यानंतर मुग्धा आणि रविश वेगळे होत आहेत. याबद्दल रविशने स्वत: इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत पती-पत्नी म्हणून आम्ही वेगळे मार्ग निवडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितलं आहे.
या पोस्टमध्ये त्याने म्हटलं आहे की, “खूप विचार केल्यानंतर, मुग्धा आणि मी पती-पत्नी म्हणून वेगळं होण्याचा आणि आमचे वेगळे मार्ग निवडण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही प्रेम आणि मैत्रीचा एक सुंदर प्रवास एकत्र केला आहे आणि तो आयुष्यभर चालू राहील. आम्ही आमच्या प्रिय चाहत्यांना, हितचिंतकांना आणि माध्यमांना विनंती करतो की, त्यांनी पाठिंबा द्यावा.”
यापुढे त्याने म्हटलं आहे की, “सर्वांना विनंती आहे की, आम्हाला आवश्यक असलेली गोपनीयता द्यावी. तसंच कृपया कोणत्याही खोट्या अफवा आणि विधानांवर विश्वास ठेवू नका. तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद.” रविशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे घटस्फोटाची घोषणा केली असली तरी, मुग्धाने यावर मौन बाळगलं आहे आणि तिने घटस्फोटाबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

मुग्धाच्या चाफेकर ही ‘धरती का वीर योद्धा पृथ्वीराज चौहान’ मालिकेतील संयोगिता भूमिकेमुळे ओळखली जाते. तसंच ती ‘कुमकुम भाग्य’ मालिकेशिवाय ‘सजन रे झूठ मत बोलो’, ‘गोलमाल है भाई सब गोलमाल है’, ‘सप्तरंगी ससुराल’ या हिंदी मालिकांमध्ये दिसली. तर २०२२ साली ती ‘रुप नगर के चीते’ या मराठी चित्रपटातही दिसली होती.
तर रविश देसाईदेखील अनेक टीव्ही मालिका व वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. ‘ये है आशिकी’, ‘मेड इन हेवन’, ‘शी’ (सीझन २) आणि ‘स्कूप’ गाजलेल्या या वेब सीरिजमधून तो प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. याशिवाय तो शेवटचा ‘विजय ६९’ मध्ये दिसला होता. दरम्यान, मुग्धा व रविश या दोघांच्या वेगळे होण्याच्या निर्णयाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.