Kunal Kamra Controversy : प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराने (Kunal Kamra) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं नाव न घेता गाणं सादर केलं आहे. कुणाल कामराने हे गाणं ‘दिल तो पागल है’मधील ‘भोली सी सुरत’ या गाण्याच्या चालीवर म्हटलं. कुणाल कामराने एकनाथ शिंदेंचं थेट नाव घेतलं नसलं तरी गाण्यात गद्दार असा केला आहे. या गाण्याचा व्हिडीओदेखील त्याने समाजमाध्यमांवर शेअर केला आहे. या गाण्यामुळे दोन दिवसांपासून बराच वाद सुरू आहे.
यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्वत: एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अशातच आता सुप्रसिद्ध मराठी अभिनेता सुशांत शेलारनेही याप्रकरणी त्याची भूमिका स्पष्ट केली आहे. सुशांतने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे व्हिडीओ शेअर केला आहे आणि कुणाल थेट धमकीवजा इशाराच दिला आहे. “कुणाल कामरा तु तुझ्या लायकीत राहा” असं कॅप्शन देत सुशांतने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
व्हिडीओमध्ये सुशांतने असं म्हटलं आहे की, “कुणाल कामराने जो काही कविता करण्याचा प्रयत्न केला आणि कलाकार म्हणून अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली जे काही त्याने गुण उधळले आहेत, त्याचा मी निषेध करतो. तू एक कलाकार आहेस तर तू एक कलाकार म्हणून वाग. टीका किंवा कवीत्व करायची तुझी लायकी नाही.”
यापुढे त्याने म्हटलं आहे की, “अशा व्यक्तीवर कविता करणं ज्याने महाराष्ट्राच्या जनतेसाठी आयुष्यभर इतकं काम केलं आहे. ज्यांना अनाथांचा नाथ म्हणून ओळखलं जातं. त्याच्या एक टक्का काय, एक अंशसुद्धा तुझ्यात नाही. तेवढी तुझी पात्रताही नाही. तर मी तुला ताकीद देतो की, तू जी कविता केली आहे. त्याविषयी चोवीस तासांत माफी माग. तुझ्या तोंडाला काही काळं फासणार नाही. पण तू जिथे असशील तिथे तुला शिवसेना स्टाइलने फटकावलं जाईल.”
पुढे सुशांतने कुणालला थेट इशारा देत असं म्हटलं आहे की, “तू जे काही कार्यक्रम करत फिरतोस. ते महराष्ट्रात कुठेही होऊ देणार नाही. त्याचबरोबर मी काही स्टुडिओजनाही सूचना देतो की, तुम्ही त्याला कार्यक्रमासाठी स्टुडिओ दिलात आणि त्याचं काही नुकसान झालं तर आम्ही त्याला जबाबदार राहणार नाही. पुन्हा एकदा कुणाल कामरा स्वत:च्या लायकीत राहा. अभिव्यक्तीच्या नावाखाली कविता करणं बंद कर नाही तर तुझं काही खरं नाही”.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणानंतर कुणाल कामरा याने ज्या ठिकाणी ते गाणं म्हटलं आणि शो केला त्या युनीकॉन्टिनेंटल हॉटेलची, तिथल्या ‘दी हॅबिटॅट’ या स्टुडिओची शिवसेना (शिंदे) कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यासह अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. कुणाल कामराचं वर्तन योग्य नाही असं फडणवीस म्हणाले