Kunal Kamra : कॉमेडियन कुणाल कामराने एकनाथ शिंदेंबाबत एक विडंबनात्मक गाणं रचलं. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. तसंच कुणाल कामराच्या विरोधात पोलीस तक्रारीही करण्यात आल्या. त्याला तीनवेळा समन्सही बजावण्यात आलं. कुणाल कामरा चौकशीसाठी आलेला नाही. दरम्यान मराठी रंगभूमी आणि चित्रपट गाजवणाऱ्या अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांनी याबाबत आता भाष्य केलं आहे.
काय आहे कुणाल कामराचं प्रकरण?
कुणाल कामराने मुंबईच्या खार येथील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये कॉमेडी शो केला. या शोमध्ये एकनाथ शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत हिंदी गाण्यांचं रिमिक्स करून त्यानं गाणी म्हणून दाखवली. यावरून आता मोठा वाद सुरू झाला आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या क्लबची तोडफोड केली. एकीकडे तोडफोड करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असताना दुसरीकडे कुणाल कामराविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढंच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कुणाल कामराचं वक्तव्य चुकीचं असल्याचं म्हटलं होतं. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हा विषय गाजला. या सगळ्या वादानंतर कुणाल कामराने चार पानांची पोस्ट लिहिली. त्यातही त्याने आपण काहीही चुकीचं वागलो नाही आणि आपण माफी मागणार नाही असं म्हटलं आहे. तसंच नंतरही पोस्ट करुन कुणाल कामराने सरकारला डिवचलं होतं. कुणाल कामरा आणि स्टँड अप कॉमेडी बाबत अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांनी काय म्हटलं आहे?
स्टँड अप कॉमेडीबाबत अशोक सराफ काय म्हणाले?
स्टँड अप कॉमेडी हा कॉमेडीचा एक प्रकार आहे. ती कॉमेडी चांगली आहे निश्चित. पण एका ठिकाणी उभं राहून केलेल्या डायलॉग्जला म्हणजे पंचला जास्त महत्त्व आहे. पंच असणं महत्त्वाचं असतं, एक पंच मारला की तो किती चांगला फुलवता हे महत्त्वाचं असतं. तर वंदना गुप्ते म्हणाल्या, “दुसऱ्यांची टिंगल करतच स्टँड अप कॉमेडी उभी राहते. त्याशिवाय ती कॉमेडी होऊ शकत नाही.” ‘नवशक्ती’ या युट्यूब चॅनलला या दोघांनीही मुलाखत दिली. त्यात त्यांनी ही भूमिका मांडली आहे.
कुणाल कामराबाबत काय म्हणाले अशोक सराफ आणि वंदना गुप्ते?
कुणाल कामराबाबत प्रश्न विचारला गेला असता वंदना गुप्ते म्हणाल्या,”दुसऱ्यांची टिंगल करण्यात तुमच्या कलेचा आनंद कशाला घेता? तुमची स्वतःची गोष्ट सांगा. त्यातून हसवा लोकांना. आपल्याकडे फक्त लॉजिकल कॉमेडी चालते, इलॉजिकल कॉमेडी चालत नाही.” तर अशोक सराफ म्हणाले, “टिंगल करुन तुम्ही हसवू शकता. पण अस्सल कॉमेडी करुन दाखवा”