बालकलाकार म्हणून कुणाल खेमूची कारकीर्द ही उत्तमोत्तम चित्रपटांनी रंगलेली आहे. पण, बालकलाकार म्हणून यश मिळाल्यावर मोठेपणी अभिनेता म्हणूनही प्रेक्षकांकडून मान्यता मिळणे हे सहज सोपे नाही. याचा अनुभव कु णाल खेमूने घेतला आहे. २००५ साली आलेल्या ‘कलियुग’ चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता म्हणून पुन्हा पदार्पण करणाऱ्या कुणालने आपल्या चित्रपटांमधले सातत्य टिक वून ठेवले आहे. सैफ आणि करिनाच्या विवाहानंतर सोहा आणि कुणालच्या विवाहाचा मार्ग मोकळा झाला आहे. सोहासारखी मुलगी माझ्या आयुष्यात येणे हे माझे भाग्यच आहे. पण म्हणून कारकीर्दीवरचे लक्ष सोडून ताबडतोब विवाह करण्याचा आपल्या दोघांचाही विचार नसल्याचे कु णालने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
कुणाल सध्या ‘गो गोवा गॉन’ या चित्रपटात सैफ अली खानबरोबर काम करतो आहे. या चित्रपटाच्या संकल्पनेपासून प्रत्येक गोष्टीत आपला सहभाग असल्याचे कुणालने सांगितले. सोहाबरोबर जुळलेल्या नात्यामुळे सैफ आणि कुणालही एकत्र आले आहेत. पण, केवळ सैफची निर्मिती आहे म्हणून आपण या चित्रपटात पहिल्यापासून सहभागी आहोत हे म्हणणे चुकीचे असल्याचे कुणालने सांगितले. दिग्दर्शक कृष्णा डीके आणि राज या जोडगोळीच्या डोक्यात ‘झोम्बीपट’ (भयपट) करण्याचा विचार आला त्यामागे आपलाही हात असल्याचे कुणालने सांगितले. त्यानंतर सैफकडे निर्मिती आणि मुख्य भूमिकेच्या बाबतीत विचारणा झाली. अर्थातच कोणत्याही कलाकाराची या चित्रपटासाठी जशी प्रतिक्रिया असती तशीच ती सैफचीही होती, असे कुणालचे म्हणणे आहे.
सोहा आणि कुणाल ही जोडी प्रत्यक्षात एकाच चित्रपटात एकत्र आली होती. त्यामुळे विवाहाची जाहीर घोषणा झाल्यानंतर तरी तुम्ही एका चित्रपटातून काम करणार का?, या प्रश्नाला उत्तर देताना कुणालने आम्ही एकत्र येण्यासाठी चांगली पटकथा मिळाली तरच एकत्र काम करू, असे उत्तर दिले. आमची चित्रपट असो नाहीतर वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी असोत सोहा आणि मी परस्परांशी विचार विनिमय करूनच अंतिम निर्णय घेतो. आजवरच्या माझ्या यशापयशात आणि प्रत्येक निर्णयात सोहा ठामपणे माझ्याबरोबर उभी राहिली आहे. तिचे तसे असणे हे माझ्यासाठी फार मोठी ठेव आहे, असेही कुणालने यावेळी बोलताना सांगितले.
सोहाबरोबर असलेल्या नात्यामुळे आता सैफच्या प्रत्येक चित्रपटात तू दिसणार का?, या प्रश्नाला मात्र तसे काहीही होणार नाही, असे स्पष्ट उत्तर कुणालने दिले. तिग्मांशू धुलियाच्या ‘बुलेट राजा’ या चित्रपटात केवळ सैफच्या सांगण्यावरून कुणालचीही वर्णी लागल्याची चर्चा होती. पण, ‘बुलेट राजा’ या चित्रपटाशी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगत या वृत्ताचा कुणालने स्पष्ट शब्दांत इन्कार केला.