एकीकडे लग्नाच्या मुहूर्त असल्याने विवाह सोहळ्यांना सुरुवात झालेली असताना कलर्स मराठी वाहिनीवरील ‘कुंकू, टिकली आणि टॅटू’ या मालिकेमध्येही लग्न सोहळ्याची धूम पाहता येणार आहे. मालिकेतील मुख्य पात्र रमा आणि राज यांच्या लग्नाची रंगत २३ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता प्रक्षेपित होणाऱ्या भागामध्ये पाहावयास मिळणार आहे. या लग्नाला कलर्स मराठी परिवाराच्या ‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिकेतील निंबाळकर कुटुंबीय म्हणजेच राधा तिचे आई-वडील आणि प्रेम देशमुख सहभागी होणार आहेत. मात्र हा विवाहसोहळा दोन परस्पर विरोधी विचारसरणींचा मेळ असल्याने त्यामध्ये कशा प्रकारे अडथळे येतील, हे पाहणे रंजक असणार आहे.
कलर्स मराठीवर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘कुंकू, टिकली आणि टॅटू’ मालिकेला अल्पावधीतच प्रसिद्ध मिळाली आहे. मालिकेतील कुलकर्णी कुटुंबामध्ये स्त्रियांबाबत ‘बाईनं बाई सारखं वागावे आणि मर्यादेत राहावे’ अशी भूमिका आहे. त्यामुळे लग्न करून घरामध्ये दाखल होणाऱ्या रमासारख्या आधुनिक विचारशैलीच्या मुलीचा कुटुंबामध्ये कसा निभाव लागणार आहे, हे प्रेक्षकांना पुढील भागांमध्ये पाहता येणार आहे. कुलकर्णी कुटुंबामधील विभा कुलकर्णी यांचा आपल्या सुनांवर वचक असल्याने या घरातील स्त्रिया त्यांनी आखून दिलेल्या चौकटीतच जगत आहेत. हे घर अत्यंत पारंपरिक पण प्रसंगी कर्मठ आहे. तर दुसरीकडे विभा यांच्या मुलगा राजशी विवाहबद्ध होऊन घरात येणारी रमा आजच्या युगातली कार्यक्षम, स्वाभिमानी आणि स्वावलंबी मुलगी आहे. त्यामुळे रमाची आधुनिक विचारसरणी आणि कुलकर्णी कुटुंबाचा परंपरावाद यांचा मेळ बसून हा विवाहसोहळा निर्विघ्नपणे पार पडेल का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे येत्या कालावधीत मिळणार आहेत.
मोठय़ा बहिणीच्या सुखासाठी तिच्या सुखाचा त्याग करून राजशी लग्न करण्यासाठी रमा तयार झाली आहे. लग्न करण्यासाठी रमाने घातलेली अट तिच्या वडिलांनी स्वीकारून बहिणीचे लग्न तिला आवडणाऱ्या मुलासोबत लावून देण्यासाठी ते तयार झाले आहेत. तर दुसरीकडे विभा कुलकर्णी आपल्या मुलाच्या प्रेमाखातर या लग्नासाठी तयार झाल्या आहेत. मात्र रमाच्या आधुनिक विचारसरणीबाबत विभाला कल्पना आहे. त्यामुळे दोन परस्परविरोधी विचारसरणीच्या स्त्रिया एकत्र आल्यावर घराचे घरपण, कौटुंबिक जिव्हाळा आणि प्रेम कशापद्धतीने टिकून राहणार आहे, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
सुखविंदर सिंग यांची मैफल
पॉप गायकाच्या जीवनावर आधारित असलेल्या राजा या आगामी मराठी चित्रपटातील गाण्यांच्या ध्वनिफितीचे प्रकाशन नुकतेच एका पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते झाले. प्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग यांनी या वेळी काही निवडक गाणी सादर केली. वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. सत्यसाई मल्टिमिडिया प्रायव्हेट लिमिटेडची निर्मिती असलेला हा चित्रपट येत्या २५ मे रोजी प्रकाशित होणार आहे.