कुंकू, टिकली आणि टॅटू ही चिन्हं म्हणजे स्त्रीच्या व्यक्तिमत्वाचा आरसा समजल्या जातात. मात्र आज स्त्री – पुरुष ही भेदरेषा पुसट होण्याच्या मार्गावर आहेत. स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने सगळ्याच क्षेत्रात भरारी घेत असताना या चिन्हांमधूनच व्यक्त व्हायची आज खरंच गरज आहे का? आजच्या काळात या प्रतिकांचा नेमका अर्थ काय? ही प्रतिकं काय सांगू पाहतायत? कलर्स मराठी वाहिनीवर “कुंकू, टिकली आणि टॅटू” नावाची मालिका सुरु झालीय, त्यानिमित्ताने समाजातील वेगवेगळ्या स्तरातील मान्यवरांचं कुंकू, टिकली, टॅटू या प्रतिकांबाबत काय म्हणणं आहे, हे जाणून घेण्याचा केलेला प्रयत्न….

शरद उपाध्ये, राशीभविष्यकार

स्त्री ही जगन्माता आहे. भारतीय लोक या जगन्मातेचा आदर करतात त्यामुळे ” शांत पत्नी नाही ज्याचे घरी … अरण्य नाही त्यांसी दुरी”. कुंकू हे सात्विकतेचं प्रतीक आहे. पण आज केवळ सात्विकतेचं रूप धारण करून घराबाहेर पडता येणार नाही. कारण आज तिचं क्षेत्र विस्तारलंय. ती थेट अंतराळाची सफर करते. स्त्रीनं घराबाहेर पडून कर्तृत्त्व गाजवावं हे मान्य करणारा समाज ती घराची लक्ष्मी आहे हे तिने विसरू नये असं म्हणताना दिसतो. कुंकू लावा, टिकली लावा नाही तर टॅटू गोंदवा. तुमच्या स्वभावाप्रमाणे जे हवं ते धारण करण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे. मात्र घराची शांती ही केवळ तुमच्याच हाती आहे. कारण स्त्री आहे, म्हणून घर आहे. ती आहे म्हणून कुटुंबसंस्था टिकून आहे. कुंकू मध्ये सोज्वळता दिसते, टिकली मध्ये पुढारलेपण आहे तर टॅटू मध्ये धैर्य एकवटलं आहे.

सिंधुताई सपकाळ, ज्येष्ठ समाजसेविका

दिसणं महत्वाचं नाही, असणं महत्वाचं आहे. आपली परंपरा छान कपड्यांत झाकली आहे. तिचं उघड्यावर प्रदर्शन मांडू नका. आई आपला संसार, आपली मुलं उघड्यावर नाही येऊ देत. बाईचा जन्म मरण्यासाठी नाही, जगण्यासाठी आहे. तिच्या वाटेत काटेच जास्त पण तरी ती डगमगत नाही. मी स्वतः भीक मागून जगले, सरणावर भाकरी भाजून खाल्ली पण मुळीच मागे हटले नाही. सगळ्या जगाला माफ करण्याची ताकद स्त्रीमध्ये आहे. तू कुंकू लाव, टिकली किंवा टॅटू काहीही लाव पण तू अबला नाहीस, सबला आहेस हे पक्के ध्यानात ठेव!

अरुणा ढेरे, ज्येष्ठ साहित्यिक

कुंकू म्हणजे परंपरेतली क्षमाशील, सहनशील अशी सत्वशीलता तर टिकली म्हणजे स्वातंत्र्याची इच्छा करणारी आणि त्या दृष्टीने पुढे पाऊले टाकणारी आत्मविश्वासपूर्ण अशी स्निग्धता आहे. उन्मुक्त, मर्यादा सहज ओलांडणारी, साहसी आणि स्वच्छंदी असा असतो तो टॅटू. भारतीय स्त्री जीवनाचा विचार केला तर अगदी अलीकडेपर्यंत तो सोशिकतेचा म्हणजे सीतेचाच चेहरा होता, तो द्रौपदीचा चेहरा फार कमी होता. पण आता काळ झपाट्याने बदलतोय. अजूनही परंपरेतलं सत्व घेऊन जगणारी स्त्री आपल्या भोवती नांदताना दिसते. जी प्रसंगी खंबीरपणे उभी राहते. स्वातंत्र्याच्या काळापासून सगळीकडे त्यांनी आपल्या क्षमतांचं दर्शन घडवलं. या सगळ्या कुंकू परंपरेतल्या स्त्रिया मागच्या पिढीपर्यंत होत्या. यानंतर मधल्या काळातल्या स्त्रिया ज्या प्रगतीच्या वाटेवरच्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांना घराबाहेर पडून आपली वाट चोखाळायची आहे. त्यांना स्वतःच्या क्षमतांची पुरेपूर जाणीव आहे. यानंतरची नव्या पिढीतली आजची स्त्री. हिने सगळ्याच मर्यादा ओलांडल्या आहेत. जिची बुद्धिमत्ता विलक्षण आहे, नव्या जगाचं वारं ती प्यायली आहे. कुठल्याही आव्हानांना सामोरं जाण्याचं धाडस तिच्यात आहे. त्यामुळेच तिच्यात एक प्रकारची मुक्तता आहे. भारतीय परंपरेतल्या या सगळ्याच स्त्रिया मला खूप महत्वाच्या वाटतात.

अंजली भागवत आंतरराष्ट्रीय नेमबाज

माझा खेळ खरंतर पुरुषप्रधान आहे. पण माझ्या आईने मला खूप प्रोत्साहन दिलं आणि मी या खेळाकडे वळले. माझी आई ही कुंकू याच संस्कारातली आहे. तिचे उत्तम संस्कार माझ्यावर आहेत. तिची स्वप्नं तिने माझ्यात पाहिली आणि जे तिला करता नाही आलं ते करण्यासाठी तिने मला आकाश खुलं करून दिलं. त्यामुळे मी घर सांभाळून माझ्या कलेत प्राविण्य मिळवू शकले. कुंकू, टिकली किंवा टॅटू हे बाह्य आवरण आहे. तुमचे विचार सगळ्यात महत्वाचे असे मला वाटते. तुम्ही कुंकू, टिकली, टॅटू काहीही लावा पण तुमच्या आतला आवाज तुम्ही कसा ऐकता आणि आपल्या समाजासाठी काय करता, हे मला अधिक महत्वाचं वाटतं.

मंगला गोडबोले, लेखिका

कुंकू, टिकली आणि टॅटू या तिन्ही अवस्थांमधल्या बायका मी जवळून पाहिल्यात. कुंकू, टिकली आणि टॅटू यात गंध हाही एक टप्पा होता. प्रतीक तेच पण स्वरूप वेगळं. जुन्या काळात कपाळावर मेण लावून त्यावर निगुतीनं कुंकू रेखलं जायचं. नंतर स्त्री चार भिंतीतून घराबाहेर पडू लागली. वेळेच्या बचतीसाठी गंध हा पर्याय तिनं निवडला. गंध घामामुळे ओघळायचा आणि आपलं गंध वा कुंकू ओघळलेलं कुठल्याही स्त्रीला चालत नसे. दरम्यान प्लास्टिक आपल्या आयुष्यात डोकावलं आणि टिकलीचा जन्म झाला. त्यानंतर टॅटू आला. आज आपल्याला व्यक्त व्हायला इतकी विविध माध्यमं असताना शरीरावर चित्रं, नावं, प्रतिमा कोरून व्यक्त व्हायची काय गरज आहे? इतक्या वेदना सोसून आपल्या भावनांचं, प्रेमाचं असं प्रदर्शन मांडण्याचा खटाटोप कशाला? एकीकडे स्वातंत्र्याची भाषा करणारे आपण प्रतिमांमध्ये का अडकत चाललोय, हा मला पडलेला प्रश्न आहे. अंतिमतः खरं हेच आहे कि आपल्या असण्याला, जगण्याला, संघर्षाला अर्थ देणारं काय आहे, तर हे तुम्हाला सांगता येईल अशी कृतीच शेवटी तुमच्याबरोबर राहणार आहे.

Story img Loader