अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) हा त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतोच. मात्र अभिनयाबरोबरच तो त्याच्या लिखाणानेही चाहत्यांचे लक्ष वेधून घेतो. ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरांत लोकप्रिय झालेला कुशलला त्याच्या विनोदाचं जबरदस्त टायमिंग आणि हटके विनोद शैली ही त्याला इतर कलाकारांपेक्षा नेहमीच वेगळं ठरवते. अभिनयासह कुशल सोशल मीडियावरदेखील चांगलाच सक्रिय असतो.

सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो शेअर करत असतो. त्याचबरोबर त्याच्या फोटोखालचे कॅप्शनही अनेकदा लक्ष वेधून घेतात. कुशल त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टद्वारे अनेक विषयांवर भाष्य करत असतो. सामाजिक, राजकीय किंवा इतर अनेक विषयांबद्दल तो त्याच्या शब्दांत भावना व्यक्त करत असतो. अशातच त्याने नुकतीच सोशल मीडियावर मिशीबद्दलची खास पोस्ट शेअर केली आहे.

कुशलने स्वत:च्या काही फोटो शेअर केले आहेत आणि या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “मिशी… पहिली प्रेयसी, पहिली नोकरी, पहिलं घर जसं विसरता येत नाही. तसंच पहिल्यांदा काढलेली मिशीसुद्धा विसरता येत नाही. मी पहिल्यांदा मिशी काढली तेव्हा इयत्ता १०वी मध्ये होतो. जवळ जवळ आठवडाभर आरसासुद्धा अनोळखी माणसासारखा माझ्याकडे बघायचा. मी शाळेत, क्लासमध्ये रुमाल धरून कितीतरी दिवस फिरलो होतो.”

अभिनेता कुशल बद्रिके
अभिनेता कुशल बद्रिके

यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, शहीद भगतसिंग यांच्या थोर कामाबरोबर त्यांच्या मिश्यासुद्धा मला तेवढ्याच लक्षात राहिल्या. “मुछे हो तो नथ्थूलाल जैसी” हे बालपणी ऐकलेलं वाक्य पुढे आयुष्यभर का लक्षात राहिलं कुणाचं ठाऊक. नंतर नशिबात जे काम आलं त्यात बहुतेकदा दाढी मिशी काढावीच लागली”.

यापुढे कुशलने असं म्हटलं आहे की, “चार्ली चॅप्लिनची मिशी कधी माझ्या ओठांवर चिकटली नाही, पण त्याचं लोकांना हसवण्याचं काम मात्र माझ्या नशिबाला अगदी घट्ट चिकटलं. फक्त एका गोष्टीचं उत्तर मला आजतागायत सापडलं नाही की मिशीला कोणतीही चव नसताना, काही लोक दातांना “उसाचं गुऱ्हाळ” करून त्या मिश्या “उसा” सारख्या चावत का बसतात?”

कुशलने शेअर केलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी या त्याच्या फोटोला लाईक्स आणि कमेंट्सद्वारे प्रतिसाद दिला आहे. शिवाय कुशलने लिहिलेल्या कॅप्शनचंही अनेकांनी कौतुक केलं आहे.