मनोरंजन विश्वात कलाकार मंडळी काम करत असताना एकमेकांचे जिगरी दोस्त होऊन जातात. दिवसातला बराचसा वेळ सेटवर एकत्र घालवल्यामुळे त्यांच्यात मैत्री होते. मराठी सिनेविश्वातील अशीच एक मित्रांची जोडी म्हणजे अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) व दिग्दर्शक संजय जाधव (Sanjay Jadhav). हे दोघे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. आपले अनेक फोटो व व्हिडीओ पोस्ट करत ते चाहत्यांच्या संपर्कात रहात असतात. अशातच कुशलने संजय जाधवसाठी एक खास व्हिडीओ शेअर केला आहे, जो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

कुशलने संजय जाधवबरोबरचा एक हटके व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओखाली त्याने त्याचं कौतुक केलं आहे. या पोस्टमध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “संजू दादा म्हणजे “यारो का यार है.” जर आपल्या सिनेमाला डीओपी म्हणून ‘द-संजय जाधव’ आहेत, तर माझ्यासारखा दिसायला ‘अट्टल’ असलेला माणूस पण ‘विठ्ठल’ दिसतो. ही त्याच्या सिनेमॅटोग्राफीची (छायांकन) कमाल आहे. त्यात तुला स्वतःचं असं वेगळं वय नाही, सिनेमातल्या पाच वर्षांच्या मुलालाही तू त्याचा दोस्त वाटतोस आणि शशांक शेंडे सरांसारखे सीनिअरसुद्धा तुझ्याकडे मन मोकळं करतात.”

यापुढे त्याने म्हटलं की, “निर्मिती सावंत ताईसारखी जागतिक दर्जाची अभिनेत्री तुझ्या सिनेमात काम करायचा हट्ट करते. काहीतरी जादू आहे तुझ्यात हे नक्की. संजू दादा तू सोबत असलास की सिनेमा तर सुंदर होतोच, पण सिनेमाच्या आठवणीसुद्धा मनात तितक्याच सुंदर छापल्या जातात.” यापुढे त्याने शेअर केलेल्या रीलबद्दल म्हटलं आहे की, “ही रील आपल्या सिनेमाच्या खूप आठवणी सांगत राहील.”

लोकप्रिय रॅपर संबाटाच्या ‘हुड लाईफ’ गाण्यावर त्यांनी हा व्हिडीओ केला असून यातून त्यांचा अगदी कुल अंदाज पाहायला मिळत आहे. तशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या आहेत. श्रेया बुगडे, हेमांगी कवी, प्रार्थना बेहेरे, अमृता खानविलकर, हर्षदा खानविलकर, क्रांती रेडकर, तेजस्विनी पंडित आणि विदुला चौगुले यांसारख्या अनेक कलाकारांनी या रील व्हिडीओवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

कुशल बद्रिके आणि संजय जाधव
कुशल बद्रिके आणि संजय जाधव

दरम्यान, कुशलने ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. शिवाय तो ‘मॅडनेस मचायेंगे’ या हिंदी कार्यक्रमातूनही प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. तर संजय जाधव लवकरच ‘येरे येरे पैसा ३’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. या चित्रपटात तेजस्विनी पंडित, उमेश कामत, सिद्धार्थ जाधव, संजय नार्वेकर यांसारखी कलाकार मंडळी आहेत.