रवींद्र पाथरे
एकवीस वर्षांपूर्वी अशोक समेळ लिखित आणि विनय आपटे दिग्दर्शित ‘कुसुम मनोहर लेले’ हे क्षोभनाटय़ (मेलोड्रामा) रंगभूमीवर गाजले होते. त्यावेळी त्याचे पाचशेहून अधिक प्रयोग झाले होते. पुण्यातील एका सत्यघटनेवर बेतलेल्या विनिता ऐनापुरे यांच्या कथेवर आधारित या नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद न लाभता तरच नवल. अर्थात त्यावेळी दिग्दर्शक विनय आपटे यांनी त्यांच्या प्रकृतीधर्मानुसार या नाटकातले भावप्रक्षुब्ध क्षण जास्त ठळकपणे अधोरेखित केले होते. त्यापश्चात आता दोन दशकांचा काळ लोटलेला असल्याने आणि रंगभूमीच्या तंत्र-मंत्रातही खूप बदल झालेले असल्याने हे क्षोभनाटय़ आता कसं काय स्वीकारलं जाईल, हा प्रश्न प्रयोग पाहायला जाताना स्वाभाविकपणेच मनात आला होता. तथापि दिग्दर्शक प्रदीप मुळ्ये (तेच ते.. सर्जनशील नेपथ्य व प्रकाशयोजनाकार!) यांनी कालानुरूप हे क्षोभनाटय़ वास्तव स्तरावर आणून हा प्रश्न निकाली काढल्याने सुखद धक्का बसला.
अत्यंत सभ्य, सुसंस्कृत मध्यमवर्गीय तरुणाचा संभावित मुखवटा चढवून फसवल्या गेलेल्या आणि तो धक्का सहन न होऊन भ्रमिष्ट झालेल्या सुजाता देशमुख या घटस्फोटित स्त्रीच्या उद्ध्वस्ततेची ही कहाणी आहे. त्यातही संस्कृतीचा अभिमान बाळगणाऱ्या पुण्यासारख्या शहरात ही घटना घडावी, यापरतं दुर्दैव ते कोणतं? त्याहून भीषण म्हणजे हे कर्म करणारा माणूस आज सुखेनैव आयुष्य जगतो आहे आणि ती दुर्दैवी स्त्री मात्र अनाथाश्रमात भ्रमिष्टावस्थेत दिवस कंठते आहे. ना तिला कायद्याने न्याय मिळाला, ना स्त्रीशक्ती चळवळीकडून! कारण तिला अशा काही चलाखीनं फसवलं गेलं होतं, की कायदेशीररीत्या ती काहीही सिद्ध करू शकली नाही. (नाटकात या घटनेचा संदर्भ असला तरीही संबंधितांची नावे बदललेली आहेत.)
पुण्यातील सुयोग विवाह मंडळात घटस्फोटित सुजाताने पुनर्विवाहाकरता नाव नोंदवलं होतं. सुयोगचं काम बघणाऱ्या निर्मलाताई त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक विवाहेच्छुक व्यक्तीची स्वत: जातीने शहानिशा करीत आणि नंतरच त्यांची नोंदणी करून घेत. सुजाता पहिल्या लग्नाच्या अनुभवाने आधीच खूप पोळली होती. तिचा नवरा व्यसनी, वासनांध होता. त्याच्या असह्य़ छळास कंटाळून तिने घटस्फोट घेतला होता. त्यामुळे आता पुन्हा लग्न करताना ती ताकही फुंकून प्यायली तर ते स्वाभाविकच होतं. निर्मलाताईंकडे मनोहर लेले या घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज केलेल्या एका तरुणाचं स्थळ नोंदलेलं होतं. त्याच्या बायकोनंच घटस्फोटासाठी अर्ज केला असल्याने कोणत्याही क्षणी घटस्फोट मिळून तो मोकळा होणार होता. त्याचा बायोडेटा पाहून सुजाताला हे स्थळ आपल्याकरता योग्य वाटलं होतं. निर्मलाताईंनी त्याप्रमाणे दोघांची गाठ घालून दिली. मनोहर लेलेच्या लोभस, सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वाने आणि अति प्रेमळ स्वभावामुळे सुजाताला आपण ज्या जोडीदाराची इतकी वर्ष स्वप्नं पाहत होतो तो म्हणजे मनोहर लेलेच होय, याची त्यांच्या प्रथमभेटीतच खात्री पटली. पुढे दोघांच्या भेटीगाठी वाढत गेल्या. मात्र, दुधात मिठाचा खडा पडावा तसा मध्यंतरी एकदा मनोहरची बहीण सुमी हिने निर्मलाताईंना भेटून त्याच्याबद्दल त्यांना सावध केलं होतं.. की तो सरळमार्गी नाहीए. पण मनोहरने यावर खुलासा करताना सुमी हीच कशी पुण्यात बदनाम आहे हे निर्मलाताईंना सांगितलं होतं. तरीही निर्मलाताईंनी सुजाताला लेलेंबाबत सावध करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा अजून कायदेशीर घटस्फोट झालेला नाही, तेव्हा पुढची पायरी गाठण्यापूर्वी नीट विचार कर. मात्र मनोहरच्या पहिल्या बायकोचा निर्मलाताईंना फोन आल्याने त्यांचा हा संशयही फिटला होता. तिने आपण कोणत्याही परिस्थितीत मनोहरपासून घटस्फोट घेणार असल्याचं निर्मलाताईंना ठासून सांगितलं होतं.
एव्हाना मनोहरच्या आकंठ प्रेमात पडलेल्या सुजाताला (मनोहरने तिचं नाव प्रेमानं ‘कुसुम’ ठेवलं होतं!) त्याच्यापासून दिवस गेले होते. सुजाता व मनोहर साखरपुडा करून पुण्यापासून काहीशा दूर असलेल्या औंध भागात त्याने घेतलेल्या नव्या फ्लॅटवर राहायला गेले; जेणेकरून लोकापवादास तोंड द्यावे लागू नये. मनोहरचा घटस्फोट झाल्यावर ते कायदेशीररीत्या लग्न करणार होते. दरम्यान, आपण गरोदर असल्याचं कुणाला समजू नये म्हणून सुजाताने ऑफिसमधून बिनपगारी दीर्घ रजा घेतली. ती थेट बाळंतपणानंतरच कामावर रुजू होणार होती. बाळंतपणाकरता जिथे तिचं नाव घातलं गेलं ते हॉस्पिटलही नवं होतं. त्यामुळे या गोष्टीचा बभ्रा होऊ नये याची पुरेपूर दक्षता मनोहरने घेतली होती.
यथावकाश ‘कुसुम’ (सुजाता) बाळंत झाली. तिला घरी आणण्यापूर्वीच मनोहरने तिच्या व बाळाच्या सेवेसाठी घरात चोवीस तास एक कामवाली बाईही ठेवली होती. हॉस्पिटलमधून घरी येताच तिने बाळाचा ताबा घेतला. तीच त्याचं सगळं करू लागली.
अशात एके दिवशी अचानक मनोहरच्या पहिल्या बायकोचा फोन आला : तिला होस्टेल खाली करण्याची नोटीस मिळाल्यामुळे ती मनोहरच्या घरी राहायला येणार होती. कुसुमसाठी हा पहिला धक्का होता. त्यानंतर याहून दुसरा भयानक धक्का खुद्द मनोहरच तिला देतो.. ‘कामवाली बाई ही माझी पहिली बायको असून, तिला मूल होत नसल्याने मी तुझ्याशी प्रेमाचं नाटक केलं आणि मुलाला जन्म दिला. आता तुझी गरज संपली आहे, तेव्हा तू या घरातून चालती हो..’ असं सांगून! सुजाताचा मनोहरच्या बोलण्यावर क्षणभर विश्वासच बसत नाही. आपल्यावर जीवापाड प्रेम करणारा, आपल्याला फुलासारखं जपणारा हा माणूस आज अचानक असं का बोलतोय? ती त्याला आधी आर्जव, विनवण्या करून, नंतर पोलिसांत जाण्याची धमकी देऊन आपलं मूल आपल्याला द्यावं म्हणून आक्रोश करते. तेव्हा मनोहर तिला कमालीच्या थंडपणे समजावतो, की हे मूल तुझं आहे हे सिद्ध करणारा एकही पुरावा अस्तित्वात नाही. तेव्हा तू इथून तोंड काळं करावंस हे बरं. तिच्या आकांताला दाद न देता तिला धक्के मारून घराबाहेर काढलं जातं. मनोहरने अत्यंत हुशारीने मुलाच्या जन्माचा कोणताच कायदेशीर पुरावा तिच्या हाती लागू नये याची पुरेपूर व्यवस्था केलेली असते. आणि कोणताही पुरावा हाती नसल्याने कुणी तिला मदतही करू शकत नव्हते. अगदी सुयोग विवाह मंडळाच्या निर्मलाताई आणि त्यांचे यजमानही!
पण.. तरीही तिला न्याय मिळतो. कसा, ते प्रत्यक्ष नाटकात पाहणंच योग्य ठरेल.
नाटककार अशोक समेळ यांनी मूळ कथेचं नाटय़रूपांतर करताना कलात्मक स्वातंत्र्य घेतलं आहे. ते प्रेक्षकानुनयी असलं तरीही सुजाताच्या बाबतीत प्रत्यक्ष वास्तवात काय घडलं याचीही माहिती ते पात्रांकरवी नाटकाअखेरीस प्रेक्षकांना देतात. ज्यामुळे संभावितांच्या जगाचं जे भीषण वास्तव समोर येतं, त्यामुळे प्रेक्षक हलून जातात. या वास्तवकथनाने नाटक अपेक्षित परिणामाच्या पल्याड जातं.. पाहणाऱ्याच्या मनात घर करतं.
दृश्यसंकल्पनाकार आणि नाटकाचे दिग्दर्शक प्रदीप मुळ्ये यांनी मूळ नाटकातील मेलोड्रामा कमी करून ते वास्तवदर्शीपणे सादर केलं आहे. पात्रांचं वागणं, बोलणं, वावरणं या सगळ्यातून तर ते जाणवतंच; पण दृश्यपरिणामांतूनही त्यांनी ते साधलं आहे. पहिलं म्हणजे सुयोग विवाह मंडळाचं कार्यालय पुण्यातलं आहे हे त्यांनी समोरच्या रस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्या सायकलींवरून विलोभनीयरीत्या ठसवलं आहे. तो पलीकडचा रस्ता इतका अस्सल आहे की ‘नेपथ्यास टाळी’ ही संकल्पना जरी नाटकासाठी हानीकारक समजली जात असली, तरी या नाटकाच्या बाबतीत मात्र ते परिणामकारकतेत मोलाची भर घालणारं ठरलं आहे. (नेपथ्य : प्रदीप मुळ्ये!) संपूर्ण नाटक दिग्दर्शकीय नजरेतून दाखविण्याची जबाबदारी प्रदीप मुळ्येंनी घेतलेली असल्याने प्रकाशयोजना आदींत ते प्रकर्षांनं जाणवतं. त्यांनी नाटकाची हाताळणी संयत राहील यांची दक्षता घेतली आहे. यात मनोहर हा खलनायक असला तरी त्याचं खलत्व परिस्थितीतून निर्माण झालेलं आहे. त्याची ही मजबुरी लोकांसमोर येईल असं दिग्दर्शकानं पाहिलं आहे. नाटकातील धक्के, कलाटणी या गोष्टी अतिशय इंटेन्सिटीने प्रतिबिंबित होतात. नाटकातला भाच्या हे रॉबिनहूड छापाचं पात्र अनैसर्गिक असलं तरी ते बटबटीत होणार नाही याची काळजी घेतली गेली आहे. भाबडेपणाने सुजाता संभाविताच्या गळास लागते आणि भावनेच्या आहारी जाऊन वाहवत जाते. नाटकात जरी कायदा हातात घेऊन भाच्या हा कथित समाजसेवक तिचं मूल तिला परत मिळवून देत असला तरी वास्तवात असं कधी घडत नाही. याची जाणीव नाटकाअखेरीस पात्रांच्या तोंडून ‘त्या’ सत्यघटनेतील व्यक्तींचं आजचं वर्तमान सांगून प्रेक्षकांना करून दिली गेली आहे. त्यामुळे नाटकातून चुकीचा संदेश जात नाही. पात्रनिवडीत व त्यांच्या संयमित हाताळणीत दिग्दर्शकाचं र्अध यश सामावलं आहे. कुठल्याही पात्राला दिग्दर्शकानं आक्रस्ताळं होऊ दिलेलं नाही. अगदी जिच्या आयुष्याची ससेहोलपट झाली, त्या सुजातालादेखील! मनोहरची खलवृत्ती उघड झाल्यावरही त्याला राणाभीमदेवी थाटात पेश करण्याचं त्यांनी टाळलं आहे. ही सगळी माणसं तुमच्या-आमच्यासारखीच हाडामांसाची आहेत, त्यांच्या हातून जे घडतं (चुका, अपराध) ते मनुष्यस्वभावास धरून आहे, हे ठसवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
कलावंतांनीही दिग्दर्शकाचा हा दृष्टिकोन समजून घेऊन आपापल्या भूमिका साकारल्या आहेत. (मी पाहिलेल्या प्रयोगात संग्राम समेळ यांनी मनोहरची भूमिका साकारली होती. नाटकात परस्परांच्या भूमिका शशांक केतकर आणि संग्राम समेळ आलटून पालटून करतात.) संग्राम समेळ यांनी मनोहरचं सुरुवातीचं अत्यंत सभ्य, सुसंस्कृत रूप आणि सुजाताकडून मूल प्राप्त झाल्यावर तिला झुरळासारखं झटकणं, या दोन टोकाच्या प्रवृत्ती संयमितपणे आविष्कृत केल्या आहेत. मात्र, या कृत्यामागे आपली हतबलता आहे, हेही ते सूचित करतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल प्रेक्षकांना किंचित सहानुभूतीही वाटते. सुजाताची विविध भावआंदोलनं पल्लवी पाटील यांनी उत्कटतेनं व्यक्त केली आहेत. अगदी बाळंतपणानंतर स्त्रीत होणारं स्थित्यंतरही! आपलं मूल आपल्यापासून हिरावून घेतल्यानंतरचा तिचा (संयत) आक्रोश डोळ्यांत पाणी आणतो. सूक्ष्म भावदर्शनात त्या कमी पडत नाहीत. भाच्या हे रॉबिनहूड छाप पात्र साकारताना शशांक केतकर रस्त्यावरील गुंड आणि रॉबिनहूड यांतला भेद जाणून आहेत याची खात्री पटते. डॉ. मानसी मागीकर यांनी निर्मलाबाईंची सेवाभावी वृत्ती देहबोलीतून व्यक्त केली आहे. त्यांचे नको एवढे बोलघेवडे यजमान सतीश जोशी यांनी अस्सलतेनं उभे केले आहेत. प्रियांका कासाळे यांनी गावभवानी सुमीचा (मनोहरची बहीण) फणकार नेमकेपणानं दर्शवला आहे. तर कुसुम तथा कामवाली (लेलेची पहिली पत्नी) झालेल्या किरण रजपूत यांनी अपत्यहीन स्त्रीची व्यथा आणि जिचं मूल आपण हडपलंय त्या सुजाताप्रती तिला वाटणारी अनुकंपा तसंच आपला नवरा काही काळ हिच्याशी रत झाला याबद्दल वाटणारी स्त्रीसुलभ तिरस्कारही ठोसपणे व्यक्त केला आहे.
‘कुसुम मनोहर लेले’चे हे नवं रूप नक्कीच अनुभवावं असंच!