L-2 Empuraan Collection : मल्याळम चित्रपट ‘एल-२ एम्पुरान’ (L-2 Empuraan) ने आज (शनिवार) बॉक्स ऑफिसवर नऊ दिवस पूर्ण केले आहेत. सुपरस्टार मोहनलाल आणि पृथ्वीराज सुकुमारन यांचा हा चित्रपट २७ मार्च रोजी म्हणजेच ‘सिकंदर’च्या प्रदर्शनाच्या ३ दिवस आधी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी कमाईचा विक्रम रचला. गेल्या वर्षीच्या ‘आदुजीवितम द गोट लाईफ’ या चित्रपटाच्या कलेक्शनला (७.६ कोटी रुपये) मागे टाकले आहे. वादग्रस्त सुरुवातीनंतर आणि ब्लॉकबस्टर कलेक्शनमध्ये मोठी घसरण झाल्यानंतरही, मोहनलाल यांचा ‘एल-२ एम्पुरान’ हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा मल्याळम चित्रपट ठरला आहे.

२७ मार्च रोजी प्रदर्शित झालेला चित्रपट ‘एल-२ एम्पुरान’ने पहिल्या दिवशी २१ कोटी रुपयांचा गल्ला जमवला, जो मल्याळम चित्रपटसृष्टीसाठी एक विक्रम आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ११.१ कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी १३.२५ कोटी, चौथ्या दिवशी १३.६५ कोटी आणि पाचव्या दिवशी ११.१५ कोटी रुपये कमावले. त्यानंतर सहाव्या, सातव्या आणि आठव्या दिवशी अनुक्रमे ८.५५ कोटी, ५.६५ कोटी आणि ३.९१ कोटी रुपये कमावले आहेत.

सॅक्निल्कच्या मते,‘एल-२ एम्पुरान’ने पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर ८८.२५ कोटींची कमाई केली. त्यानंतर आज म्हणजेच नवव्या दिवशी सकाळी १०:३० वाजेपर्यंत चित्रपटाने ३ कोटी रुपये कमावले आहेत. एकूण कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटाने ९१.२५ कोटी रुपये कमावले आहेत. सॅकॅनिल्कवर उपलब्ध असलेले हे आकडे अंतिम नाहीत. यामध्ये बदल होऊ शकतात. ‘सिकंदर’मुळे ‘एल-२ एम्पुरान’चे नुकसान होऊ शकते असे मानले जात होते, परंतु तसे झाले नाही.

२००२ च्या गुजरात दंगलींच्या चित्रपटातील चित्रणावरून वाद निर्माण झाला होता. या विरोधाला तोंड देत, निर्मात्यांनी चित्रपटातील २४ दृश्ये कापली आणि सेन्सॉर केलेली आवृत्ती पुन्हा प्रदर्शित केली. शिवाय मोहनलाल यांनी जाहीर माफीही मागितली. या आव्हानांना तोंड देत ‘एल-२ एम्पुरान’ने स्थानिक आणि जागतिक स्तरावर कामईचे अनेक विक्रम मोडले आहेत. भारतात ९०.७८ कोटी आणि जगभरात २५० पेक्षा अधिकच्या कलेक्शनसह हा चित्रपट मल्याळम चित्रपटांच्या ऑलटाइम चार्टवर अव्वल स्थानावर आहे.

‘एम्पुरान’ हा २०१९ च्या लूसिफर या अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपटाचा सीक्वेल आहे. त्यामध्ये मोहनलाल राजकीय भूमिकेत आहेत; तर पृथ्वीराज सुकुमारन झायेद मसूदची भूमिका साकारत आहे. या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन पृथ्वीराज यांनी केले आहे. दोन्ही चित्रपट केरळमधील राजकारणाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहेत. तसेच, जागतिक गुन्हेगारी जगतातल्या सिंडिकेटचे काम यात दाखवण्यात आले आहे.