वयाच्या केवळ ३२व्या वर्षी ‘ऑस्कर’वारी करणारा डॅमियन चॅझेल हा आज जगातील सर्वात यशस्वी दिग्दर्शकांच्या यादीत गणला जातो आहे. त्याने वास्तवदर्शी विषयांत आपल्या कल्पनांचे रंग भरले आणि काहीतरी नवीन निर्माण करून दाखवले. आज संपूर्ण जग एक होतकरू दिग्दर्शक म्हणून त्याच्याकडे पाहात आहे. परंतु जितके मोठे यश तितकाच त्यामागचा संघर्षही मोठा असतो. नुकताच याचा प्रत्यय त्याने दिलेल्या एका मुलाखतीतून आला. डॅमियनने ‘फॉक्स स्टुडिओ’मध्ये प्रश्नोत्तरांच्या माध्यमांतून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दरम्यान, त्याला एका विद्यार्थ्यांने त्याचेआवडते पेय कोणते? आणि का?, असा प्रश्न विचारला. त्याने क्षणाचाही विलंब न करता कॉफी हे उत्तर दिले. कॉफी हे पेय त्याला त्याच्या संघर्षांच्या दिवसांची आठवण करून देते, असं त्याने सांगितलं. गरीब घरात जन्म झालेल्या डॅमियनकडे महाविद्यालयात शिकत असताना दोन वेळ भरपेट जेवण खरेदी करण्याचेही पैसे नसायचे. अशा वेळी हॉटेलमध्ये जाऊन कॉफी घ्यायची आणि जेवणाला जितका वेळ लागतो तितका वेळ ती कॉफी पित राहायची, असा त्याचा नित्यक्रम होता.  त्याच्या मते जगात अशक्य असं काहीच नाही. जर आपण प्रामाणिकपणे मेहनत केली तर आपल्याला अपेक्षित ध्येय साध्य करता येतं. आज जगात असंख्य लोक आहेत ज्यांच्याकडे अपेक्षित सर्व सोयीसुविधा असतानाही ते एक ध्येयशून्य आयुष्य जगतात. परंतु स्टीव्ह जॉब्ज, थॉमस अल्वा एडिसन, स्टीव्हन स्पिलबर्ग, बिल गेट्स यांसारखीही काही मंडळी आहेत ज्यांनी खडतर परिस्थितीवर मात करून जगाला अचंबित करणारे यश मिळवून दाखवले. अशाच लोकांना आदर्श मानून डॅमियनने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. आणि आज तो एक यशस्वी दिग्दर्शक म्हणून नावारूपाला आला आहे.

Story img Loader