‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटाच्या अपयशानंतर अक्षय कुमारने त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘रक्षाबंधन’ या चित्रपटामध्ये तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सोशल मीडिया अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर करत अक्षयने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित केली आहे. रक्षाबंधननिमित्तच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. पण विशेष म्हणजे अभिनेता आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाशी अक्षयची टक्कर होणार आहे.
आणखी वाचा – VIDEO : लंडनमध्ये रंगला सोनम कपूरचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम, धम्माल सेलिब्रेशन अन् गाण्यांची मैफिल
बॉक्स ऑफिसवर होणार दोन चित्रपटांची टक्कर
आमिरचा ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपट ११ ऑगस्ट रोजी बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे. तर अक्षयचा ‘रक्षाबंधन’ चित्रपटही ११ ऑगस्टलाच प्रदर्शित होत आहे. म्हणजेच यावेळी अक्षय विरुद्ध आमिर असं चित्र बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळणार आहे. पण या दोघांपैकी कोणाचा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक अधिक गर्दी करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
‘रक्षाबंधन’ हा चित्रपटाचं लेखन हिमांशू शर्मा आणि कनिका ढिल्लो यांनी केलं आहे. अक्षयने गेल्याच वर्षी या चित्रपटाची घोषणा केली होती. आपल्या बहिणीसाठी हा चित्रपट असल्याचंही अक्षयने म्हटलं होतं. आनंद एल राय यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. अक्षयसाठी देखील हा चित्रपट खास आहे.
आणखी वाचा – “काल ‘धर्मवीर’ पाहिला पण…”, अमृता खानविलकरच्या ‘त्या’ पोस्टची सर्वत्र चर्चा, प्रसाद ओकबरोबर फोटोही केला शेअर
त्याचबरोबरीने आमिर ‘लाल सिंह चड्ढा’ निमित्त काही वर्षानंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे. जवळपास चार ते पाच वर्ष या चित्रपटासाठी तो मेहनत घेत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला तर प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिली. शिवाय आमिरचा या चित्रपटामधील लूक देखील अगदी वेगळा आहे. करिना कपूर खान या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. आता कोणाचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बाजी मारणार हे पाहावं लागेल.