छोट्या-छोट्या पण वेधक भूमिकांतून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला चार्मिंग चेहेरा म्हणजे निखिल चव्हाण. झी मराठीवरील ‘लागीरं झालं जी’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेला हा ‘विक्या’ चित्रपटांतूनसुद्धा आपली नवी ओळख निर्माण करताना दिसतोय. अलीकडेच आलेल्या ‘अॅट्रॉसिटी’ या मराठी चित्रपटामधून त्याने ‘मनीष चौधरी’ नामक खलनायकाची भूमिका साकारली होती. अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या निखिलची एन्ट्री आता ‘स्त्रीलिंग पुल्लिंग’ या नव्याकोऱ्या वेब सीरिजमध्ये झाली आहे. नाटक, मालिका, चित्रपट, वेब सीरिज असा वाढतच जाणारा निखिलच्या अभिनय कौशल्याचा आलेख वाखाणण्याजोगा आहे.
कुठल्याही कलाकाराचा प्रवास सरळसोपा असा कधीच नसतो. तसंच निखिललासुद्धा अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागलं. त्याची धडपड, शिकण्याची उर्मीच त्याला आज कामी आली. करिअरची पुसटशीही कल्पना नसताना डेंग्यूमुळे बारावीत विज्ञान शाखेत निखिल नापास झाला आणि त्याच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली असं तो सांगतो. ऑक्टोबरमध्ये बारावीची परिक्षा देत असताना एकांकिकेमध्ये काम करायची संधी मिळाली आणि त्याला त्याची दिशा सापडली. म्हणूनच त्याने नंतर बीकॉमला पुणे विद्यापठात प्रवेश घेऊन बाहेर नाटक एकांकिकेमध्ये काम करू लागला. शालेय जीवनात नाटक आणि डान्स परफॉर्मन्सच्या त्रोटक अनुभवावर भविष्यात कधी मनोरंजनक्षेत्रात करिअर करेन असा विचारसुद्धा त्याने केला नव्हता. तरी पुढे त्याने त्यालाच करियर म्हणून निवडलं.
अविनाश देशमुख यांच्याकडे तो ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकामध्ये ५०० रुपये प्रति प्रयोगाने तो लाइट्स आणि म्युझिकचे काम करायचा. त्यातूनच पुढे त्याला सौरभ पारखे लिखित-दिगदर्शित ‘थ्री चिअर्स’ नाटकाची संधी चालून आली. त्यातली निखिलने साकारलेली ‘जसबीर’ची व्यक्तिरेखा लोकप्रिय झाली आणि त्याला नाटकं मिळू लागली. अशातच ‘अवताराची गोष्ट’ आणि ‘मधू इथे चंद्र तिथे’ यांसारख्या निवडक चित्रपटांत त्याने छोट्या पण महत्त्वपूर्ण भूमिका केल्या. पुण्याहून मुंबईत कामाच्या ओढीने शिफ्ट होणाऱ्या अनेक कलाकारांप्रमाणे त्याचाही काही काळ असा गेला ज्यावेळी हातात काहीच काम नव्हतं पण इच्छा मात्र प्रबळ होती. प्रत्येक कलाकराला या फेजमधून जावं लागतं पण त्यावेळी डळमळून न जाता आपला मोर्चा पुन्हा प्रॉडक्शनकडे वळवत असतानाच निखिलला तेजपाल वाघ ह्यांनी संधी दिली आणि झी मराठीवरील ‘लगीर झालं जी’ मालिकेतून तो समोर आला. फौजी विक्रमच्या भूमिकेतील निखिलला महाराष्ट्रातूनच नाही तर जगभरातील मराठी प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळालं. त्यानंतर मात्र निखिलने पुन्हा वळून मागे पाहिलं नाही.
आजच्या काळाशी सुसंगत ‘स्त्रीलिंग पुल्लिंग’ या वेब सीरिजमध्ये सध्या निखिल ‘सचिन’ ऊर्फ ‘सच्या’च्या भूमिकेत दिसत आहे. तीन मैत्रिणींच्या आयुष्यातला तिढा सोडवण्यासाठी स्वयंसज्ज असणारा हा उतावळा ‘सच्या’ काय-काय गमती घडवून आणतो आणि ‘सच्या’च्या येण्याने त्या मैत्रिणींचा तिढा सुटतो कि आणखी गुंततो हे पाहणं रंजक ठरणार आहे.