अभिनेत्री रिंकू राजगुरूच्या आगामी ‘कागर’ चित्रपटातील गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. ‘लागलीया गोडी तुझी’ हे रोमॅण्टिक गाणं असून यामध्ये रिंकू आणि शुभांकर यांची प्रेमकथा पाहायला मिळते. ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी हे गाणं शब्दबद्ध आणि संगीतबद्ध केलं आहे. कर शशा तिरुपती आणि हर्षवर्धन वावरे यांनी हे गाणं गायलं आहे.
‘सैराट’ चित्रपटानंतर दोन वर्षांनी रिंकू प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘कागर’ या चित्रपटाच्या कथेला राजकीय पार्श्वभूमी देण्यात आली आहे. १४ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र, फेब्रुवारीमध्येच रिंकूची बारावीची परीक्षा असल्याने चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्मात्यांनी निर्णय घेतला.
या चित्रपटात रिंकूसोबत अभिनेता शुभांकर तावडे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचसोबत शशांक शेंड्ये, भारती पाटील यांच्याही भूमिका आहेत. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मकरंद माने यांनी ‘कागर’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. याआधी त्यांचे ‘रिंगण’ आणि ‘यंग्राड’ हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते.
‘कागर’ ही एक प्रेम कथा आहे जी राजकारणाशी गुंफलेली आहे. ‘सुधीर कोलते’ आणि ‘विकास हांडे’ यांच्या’ उदाहरणार्थ’ या निर्मिती संस्थेने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. येत्या 26 एप्रिलला हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे.