कोणत्याही कलाकारासाठी वेगवेगळ्या माध्यमात काम करणे हे आव्हानात्मक असते आणि संधी मिळेल तेव्हा तो कलाकार हे आव्हान स्वीकारत असतो. चित्रपट, दूरचित्रवाहिनी आणि नाटक ही तीनही माध्यमे अभिनयाशी संबंधित असली तरी प्रत्येक माध्यमात काम करण्याचा अनुभव मात्र वेगळा आहे. चित्रपट किंवा दूरचित्रवाहिन्यांवर काम केल्यानंतर अनेक कलाकारांना किमान एखादे तरी नाटक करावे, असे वाटत असते. काही कलाकार नाटकातून चित्रपट किंवा दूरचित्रवाहिन्यांकडे वळतात तर काहींचा याउलट प्रवास होतो. ‘होणार सून मी या घरची’ मालिकेतील ‘श्री’ अर्थातच शशांक केतकर आणि ‘राधा ही बावरी’ मालिकेतील ‘राधा’ अर्थात श्रुती मराठे हे दोघेही जण व्यावसायिक रंगभूमीवर स्वतंत्र नाटकाद्वारे पदार्पण करत आहेत.
मराठी चित्रपट किंवा दूरचित्रवाहिन्यांवर आघाडीचे असलेल्या कलाकारांची कारकीर्द रंगमंचावरून सुरू झाली आणि आता ती मंडळी तिकडे स्थिरावली. काही जण चित्रपट व दूरदर्शन मालिकांच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आवर्जून मराठी नाटक करत असतात. अगदी डॉ. श्रीराम लागू, विक्रम गोखले यांच्यासारख्या बुजुर्ग अभिनेत्यांपासून नाना पाटेकर, प्रशांत दामले, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, शिवाजी साटम, रमेश भाटकर, मोहन जोशी, सयाजी शिंदे तसेच विजया मेहता, रिमा, आशा काळे, आशालता वाबगावकर, सुहास जोशी, दया डोंगरे, अलीकडच्या पिढीतील भरत जाधव, अंकुश चौधरी, संजय नार्वेकर, स्वप्निल जोशी, मुक्ता बर्वे आणि इतरही अनेक जण (अनेक नावे राहून गेली) रंगभूमीकडून चित्रपट व दूरचित्रवाहिन्यांकडे वळले.
रंगभूमीवर अभिनय करताना अभिनेत्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद हा समोरून ताबडतोब मिळत असतो. नाटकाचा प्रत्येक खेळ हा ‘प्रयोग’ असतो आणि कलाकाराला ते आव्हान स्वीकारावेसे वाटते. ‘होणार सून मी या घरची’ आणि ‘राधा ही बावरी’या मालिकांच्या प्रचंड लोकप्रियतेनंतर आता शशांक केतकर व श्रुती मराठे हे दोघे कलाकार दोन स्वतंत्र नाटकांद्वारे रंगभूमीवर पाऊल टाकत आहेत. सोनल प्रॉडक्शन आणि नाटय़सुमन निर्मित ‘गोष्ट तशी गमतीची’ या नाटकाद्वारे शशांक केतकर व्यावसायिक रंगभूमीवर प्रेक्षकांसमोर येत आङे. हे नाटक मिहीर राजदा यांनी लिहिले असून दिग्दर्शक अद्वैत दादरकर हे आहेत. नंदू कदम निर्माते असलेल्या या नाटकात लीना भागवत, मंगेश कदम यांच्यासह शशांक प्रमुख भूमिकेत आहे.
काही वर्षांपूर्वी रंगभूमीवर सादर झालेले ‘लग्नबंबाळ’ हे नाटक पुन्हा नव्या संचात रंगभूमीवर येत आहे. या नाटकात श्रुती काम करणार आहे. श्रुतीने महाविद्यालयात असताना नाटकातून काम केले होते. मधुगंधा कुलकर्णी लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित या नाटकाचे निर्माते चंद्रकांत लोकरे हे आहेत. ‘लग्नबंबाळ’ हे नाटक रंगभूमीवर सादर झाले तेव्हा गाजले होते. या नाटकाला विविध पुरस्कारही मिळाले होते. मधुरा वेलणकर, सुबोध भावे, राहुल मेहेंदळे, आनंद इंगळे आदी कलाकारांनी गाजविलेले हे नाटक आता नव्या संचात सादर होत आहे. जुन्या संचातील आनंद इंगळे या नाटकात आहेत. ‘गोष्ट तशी गमतीची’ या नाटकाचा पहिला प्रयोग ३ ऑगस्ट रोजी रंगभूमीवर सादर होणार आहे.
नाटक करायचेच होते -श्रुती मराठे
महाविद्यालयात असताना नाटकात काम केले होते. पण व्यावसायिक रंगभूमीवरील माझे हे पहिलेच नाटक आहे. नाटकात मला काम करायचेच होते. पण दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका आणि दक्षिणेकडील चित्रपट यातून म्हणावा तसा वेळ मिळत नव्हता. ‘राधा ही बावरी’ मालिका संपल्यानंतर मोकळा वेळ मिळाला, त्यामुळे व्यावसायिक नाटक करण्याचे मनावर घेतले. निर्माते चंद्रकांत लोकरे यांनी मला ‘लग्नबंबाळ’साठी विचारल्यानंतर मी लगेच हो म्हटले. लग्न करू पाहणाऱ्या तरुण-तरुणींसाठीचे हे नाटक आहे. नाटक पुनरुज्जीवित आहे म्हणून ते करू नये किंवा नाकारावे, असे कोणतेही कारण नव्हते त्यामुळे ते करायचे मी ठरविले.