लय भारी….अतिशय तगडी स्टारकास्ट, ठेका धरायला लावतील अशी गाणी आणि इंटरेस्टिंग प्रोमोमुळे हा चित्रपट आपल्याला खुर्चीला खिळवून ठेवणार असंच वाटलं होतं. काही प्रमाणात ही अपेक्षा पूर्णही झाली, पण कथेच्या पातळीवर कमजोर असल्यामुळे एक परिपूर्ण अॅक्शनपट बघण्याचं भाग्य काही लाभलं नाही. ‘हमशकल्स’ आणि ‘एक व्हिलन’ या लागोपाठ प्रदर्शित झालेल्या दोन्ही चित्रपटांना मिळालेल्या यशामुळे रितेश चांगलाच सुखावला आहे. आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच एक व्हिलन चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारल्यानंतर रितेश देशमुख अॅक्शनपॅक अवतारात दिसणार असल्यामुळे त्याच्या चाहत्यांची उत्सुकता गेले कित्येक दिवस ताणली गेली होती. बालक पालक, यलो या चित्रपटांच्या यशस्वी निर्मितीनंतर रितेशचीच निर्मिती असलेल्या लय भारी चित्रपटात त्याने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि मराठमोळ्या पठ्ठयाने सर्व मराठी माणसांची मने जिंकली. आज लय भारी प्रदर्शित झाला आहे. जोरदार प्रसिद्धी करण्यात आलेल्या लय भारीने सर्वांनाच वेड लावले आहे. चित्रपटाची प्रसिद्धी तर जोरात करण्यात आलीच पण सोशल मिडियावरही रितेशचाच दबदबा पाहावयास मिळत होता. माऊली आणि त्याचे संवाद केवळ प्रोमोजवरून लोकप्रिय झाले आहेत. माऊलीचा हा जयजयकार सोशल मीडियावरही जोरात सुरू असून कित्येकांनी माऊलीच्या रुपातील रितेशची छायाचित्रे, त्याचे संवाद, रितेश आणि जेनेलियाची रेखाचित्रे सोशल मीडियावर टाकली आहेत. हाच दबदबा आता तिकीट बारीवरही पाहावयास मिळेल की नाही याचा निकाल आज कळेलचं.
आई आणि मुलाच्या नातेसंबंधावर आधारित असा लय भारी हा चित्रपट आहे. गावात दबदबा आणि पत असूनही केवळ निपुत्रिक असल्यामुळे या जोडप्याला देवळातील पूजेच्या मानापासून वंचित केले जाते. पतीचा देवापेक्षा डॉक्टरवर जास्त विश्सवास असतो. मात्र, आपल्या पतीच्या नकळत पंढरपूरच्या वारीला जाऊन पत्नीने विठोबाला घातलेल्या साकड्यामुळे या जोडप्याला पुत्रप्राप्ती होते. हा मुलगा नंतर मोठा होतो. परदेशातून शिकून पुन्हा मायदेशी परततो. गावात परतल्यावर आपले काका आणि चुलत भाऊ यांच्याकडून गावक-यांचा छळ होत असल्याचे त्याला कळते. त्यांच्या जमिनी जबरदस्तीने बळकावल्या जात असल्याचे त्याच्या समोर येते. या शेतक-यांना हक्काची जमीन आणि घर मिळावं म्हणून त्या मुलाची आणि त्याच्या वडिलांची धडपड चालू असते. आपल्या मार्गात हे दोघेही अडथळा असल्याचे जाणून या दोघांचा जीव काका आणि चुलत भाऊ जीव घेतात. नंतर होते ती आपल्या लय भारी स्टाईलमध्ये माऊलीची एन्ट्री. पुढे जाऊन माऊली गावक-यांची कशी मदत करतो. यादरम्यान, त्याची प्रेमकहाणी आणि विठोबा-रखुमाईवरचे प्रेम चित्रीत करण्यात आले आहे.
डोंबिवली फास्ट, मुंबई मेरी जान, फोर्स या यशस्वी चित्रपटांनंतर दिग्दर्शक निशिकांत कामतकडून एका दमदार चित्रपटाची अपेक्षा होती. मात्र, लय भारीतून निशिकांत तितका ठसा उमटवू शकलेला नाही. मराठी चित्रपटाला बॉलीवूड आणि तामिळ चित्रपटाचा तडका दिल्यावर काय होते याचे उदाहरण म्हणजे लय भारी. सुरुवातीला आपण ९०च्या दशकातला एखादा बॉलीवूड चित्रपट बघत आहोत असे वाटते. त्यामुळे कुठे तरी पुढे काय घडणार याची चाहूल आपल्याला आधीचं लागते. पण, सुरुवातीच्या १० मिनिटांनंतरच माऊली माऊली गाणं येत आणि आपल्याला संपूर्ण भान हरपायला लावतं. तिथे चित्रपटातील उत्तम छायाचित्रांकणाचा नमुना पाहावयाला मिळतो आणि त्यातून अजय-अतुलचं संगीत त्यामुळे तुम्ही त्यात आणखीन गुंग होऊन जाता. ख-या पंढरपूर वारीचे चित्रीकरण केल्यामुळे आपण तिथे स्वतः उपस्थित आहोत असे जणू वाटते. पण, एकदा का हे गाणं संपल की पुन्हा चित्रपट एका सामान्य पटरीवर जातो. मुलं नसल्यामुळे दुःखी असलेली स्त्री, तिचे देवाला साकडे घालणे मग तिला मुलं होण, तिने देवाला केलेला नवस, गावगुंडांचा त्रास यांमध्येचं कथा अडकून राहते. त्यामुळे यात काही वेगळी कथा पाहावयास मिळत आहे असं वाटत नाही. चित्रपटाचा शेवट करताना पंढरीची वारी एका बाजूने जात असतानाच त्यांच्या बाजूने एकदी विद्युतवेगाने जाणरा ट्रक खलनायकाला उडवतो असे दृश्य आहे. यामागचा दिग्दर्शकाचा विचार काही कळतं नाही. इतकी गर्दी असतानाही बाजूने वेगाने ट्रक जाऊचं कसा शकतो? हे बहुतेक निशिकांतला तेव्हा उमगले नसावे असे वाटते. अशा छोट्या छोट्या चुका निशिकांतने निदान पुढे जाऊन तरी करू नये. मध्यांतरापर्यंत चित्रपट अगदी रटाळ असा आहे. पण मध्यांतरानंतर निशिकांतने बाजी मारली असं म्हणावयास हवं. चित्रपटाच्या कथेपेक्षा त्यातील जमेची बाजू ठरले ते म्हणजे यातील कलाकार. सुरुवातीला तर रितेश नक्की अभिनयचं करत आहे ना? असा प्रश्न पडतो. पण अॅक्शन अवतारात आल्यानंतर रितेश एक उत्कृष्ट अभिनेता का आहे याची पुरेपूर प्रचिती येते. आतापर्यंत केवळ विनोदी कलाकाराच्या भूमिकेत दिसलेला रितेश अॅक्शन भूमिकाही तितक्याच कसबीने करू शकतो हे त्याने यात दाखवून दिले. खलनायकाच्या भूमिकेत असलेल्या शरद केळकरने पूर्ण चित्रपटात आपला ठसा उमटवला. राधिका आपटे, तन्वी आझमी यांनीही त्यांना तितकीच साथ दिली आहे. अदिती पोहणकर या नवअभिनेत्रीच्या नशिबी छोटीशी भूमिका आली आहे. माणसाने मिळालेल्या संधीच सोन कराव असं म्हणतात. पण अदितीला हे कळलेलं दिसत नाही. नवखीचं असल्यामुळे तिने आपल्या अभिनयात सुधारणा करण्याच्या संधी आहेत. सलमान यात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार हे तर सर्वांना माहितचं होत. त्याप्रमाणे पाच मिनिटांसाठी का होईना पण आपली झलक दाखविणारा सलमान त्याच्या नेहमीच्याच अंदाजात सगळ्यांना हसवून जातो. याशिवाय चित्रपटात प्रेक्षकांसाठी दोन आश्चर्याचे झटकेदेखील आहेत. त्यापैकी एक म्हणजे जेनेलिया देशमुख. होळीच्या गाण्यात चुलबुली जेनेलिया ठुमके मारताना दिसते. मात्र, यातील दुसरा झटका हे तर तुम्हाला चित्रपट बघितल्यावरचं कळेल.
लय भारीतील साहसदृश्य बॉलीवूडमध्ये साहसदृश्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या कौशल-मोजसने केले आहे. त्यांनी मराठीचे भान ठेऊन साहसदृश्यांचे दिग्दर्शन केले आहे. त्यामुळे ती दृश्ये कंटाळवाणी वाटत नाहीत. रितेशची दमदार एन्ट्री, बाजूने वाजणारे संगीत आणि त्याला साजेसे असे छायांकन. कॅमे-याचा उत्तम वापर या चित्रपटात झालेला दिसतो. पंढरीच्या वारीतील वारकरी, टाळ, गोल रिंगण यांचे उत्कृष्ट छायांकन करण्यात आले आहे. बॉलीवूडलाही आपल्या तालावर नाचवणा-या अजय-अतुलने माऊली-माऊली गाण्याने तर गुंग केलेच पण होळीचे गाणेही ताल धरायला लावते. याव्यतिरीक्त मात्र इतर गाणी काही फारशी छाप पाडत नाहीत. एकंदरीत मराठीपेक्षा आपण एक तामिळ किंवा बॉलीवूडचा ९०च्या दशकातला एखाचा चित्रपट पाहत आहोत, असे लय भारी बघताना वाटते. केवळ कलाकारांचा अभिनय आणि अजय-अतुलचे अप्रतिम संगीत लाभलेले माऊली माऊली गाणे यासाठी म्हणून हा चित्रपट पाहण्यासाठी तुमचे पाय चित्रपटगृहाकडे वळू शकतात.
चित्रनगरीः मराठीला तमिळ तडका…. ‘लय भारी’
लय भारी....अतिशय तगडी स्टारकास्ट, ठेका धरायला लावतील अशी गाणी आणि इंटरेस्टिंग प्रोमोमुळे हा चित्रपट आपल्याला खुर्चीला खिळवून ठेवणार असंच वाटलं होतं.
First published on: 11-07-2014 at 09:33 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lai bhari movie review