हिंदीत सिनेमॅटोग्राफर म्हणून नाव कमावल्यानंतर लक्ष्मण उतेकरांनी दिग्दर्शनाकडे मोर्चा वळवला. ‘टपाल’ या पहिल्या चित्रपटानंतर स्पेशल चाइल्डच्या नजरेतून मुंबईची कथा सांगणारा ‘लालबागची राणी’ हा त्यांचा दुसरा मराठी चित्रपट येतो आहे. ‘डॉन २’चे चित्रीकरण करत असताना आपल्याला ‘लालबागची राणी’ या चित्रपटाची कथा सुचली, असे उतेकरांनी ‘लोकसत्ता मुंबई’शी बोलताना सांगितले.
‘डॉन २’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. गणपतीच्या गाण्याचा जो प्रसंग आहे त्याचे चित्रीकरण सुरू होते. गणपती विसर्जनाच्या दिवशी आपल्याकडे प्रचंड गर्दी असते. लालबागचा राजा विसर्जनाला येत असताना तिथे खूपच गोंधळ झाला होता आणि त्या गोंधळात आपल्या मुलीला शोधणारे आणि रडवेले झालेले आईबाबा मला दिसले. फुगे हातात असलेली मुलगी कुठे दिसते आहे का, याची ते विचारणा करत होते. त्या मुलीचे फुगे हरवले होते. फुग्यांच्या शोधात ती कुठे तरी हरवली होती आणि तिचे आईबाबा तिला शोधत होते. या एका प्रसंगातून चित्रपटाची कल्पना सुचल्याचे उतेकर सांगतात. ‘लालबागची राणी’मध्ये अशीच हरवलेली मुलगी आहे. तिच्या प्रवासात तिला भेटणाऱ्या व्यक्ती आणि तिच्या निरागसपणाचा त्यांच्यावर झालेला परिणाम, एकूणच तिच्या नजरेतून दिसणारी मुंबई या चित्रपटात पाहायला मिळेल, असे त्यांनी सांगितले.
चित्रपटाची नायिका स्पेशल चाइल्ड आहे. आपण त्यांना वेडे समजत असतो. पण ते जेव्हा आपल्याबद्दल विचार करतात तेव्हा त्यांना काय जाणवते, त्यांना आपल्या गोष्टी वेडेपणाच्या वाटत नसतील का, या विचाराने ‘लालबागची राणी’ची कथा लिहिली आहे, असे त्यांनी सांगितले. या चित्रपटाच्या कथेवर दोन-तीन वर्षांपासून काम सुरू होते. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच बोनी कपूर मराठी चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता म्हणून समोर येणार आहेत. ‘टपाल’च्या वेळी सिनेमॅटोग्राफी आणि दिग्दर्शन अशा दोन्ही जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या होत्या. मात्र या वेळी दिग्दर्शनाचीच ओढ जास्त असल्याचेही ते म्हणाले. ‘लालबागची राणी’मध्ये अभिनेत्री वीणा जामकर हिने स्पेशल चाइल्डची भूमिका केली आहे. चित्रपटाचा विषय वेगळा असला तरी त्याची मांडणी ही हलकीफुलकी आणि मनोरंजनात्मक पद्धतीने करण्यात आली आहे. अशा विषयावर नकारी विचार जास्त मांडले जातात. मात्र, या चित्रपटातून सकारात्मक मांडणीच करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
रेश्मा राईकवार, मुंबई
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा