जबरदस्त चाहता वर्ग असलेला आणि तरुणींच्या हृदयाचा ठोका चुकवणारा अभिनेता ललित प्रभाकर आता लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून ‘आदित्य’ या नावाने ललित घराघरात पोहोचला. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेतील कबीरच्या भूमिकेतून त्याने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. नेहा महाजन या गुणी अभिनेत्रीनेसुध्दा वेगवेगळ्या भूमिकेतून, वेगवेगळ्या भाषेचे सिनेमे करून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. वैशाली एंटरटेनमेंट या बॅनरखाली निर्मिती करण्यात आलेल्या ‘टी टी एम एम’ या सिनेमात या दोघांची फ्रेश जोडी पाहायला मिळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डॉ. संतोष सवाने निर्मित या आगामी सिनेमाचे चित्रिकरण पूर्ण झाले आहे. या सिनेमाची संपुर्ण टीम नवीन असली तरी सिनेमाचे निर्माते डॉ. संतोष सवाने यांच्या विश्वासामुळे आणि प्रोत्साहनामुळे सर्व टीमने उत्साहात काम पूर्ण केले.
कुलदीप जाधव या नव्या दमाच्या दिग्दर्शकाने सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. तर तेजपाल वाघ यांनी सिनेमाची कथा, पटकथा तसेच संवाद लिहिले आहेत. पंकज पडघन या सुप्रसिद्ध संगीतकारांने सिनेमातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. मयुर हरदास यांनी सिनेमॅटोग्राफी, संकलन तसेच क्रिएटीव्ह प्रोडयुसरची जबाबदारी सांभाळली आहे. नीरज वळसंगकर आणि प्रतिक जोशी हे सिनेमाचे एक्झिक्युटिव्ह प्रोडयुसर आहेत. गौरव व तेजस गोगावले यांनी सिनेमाचे कलादिग्दर्शन केले आहे. तसेच हेतल चौधरी यांनी वेशभूषा केली आहे.

ललित- नेहा यांच्यासह विद्याधर जोशी, सविता प्रभुणे, सतिश पुळेकर, सीमा देशमुख, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, पुष्कराज चिरपुटकर, पुष्कर लोणारकर, शर्वरी लोहकरे यांचा अभिनय आपल्याला सिनेमात पाहायला मिळणार आहे. गुरू ठाकुर, क्षितिज पटवर्धन, ओमकार दत्त यांची बहारदार गीते असलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज आहे. ‘टी टी एम एम’ याचा आपल्या रोजच्या आयुष्यातला अर्थ पटकन लक्षात येतो, मात्र याच ‘टी टी एम एम’च्या काही वेगळ्या छटा पण आपल्या आयुष्यात असतात याचा अनुभव हा सिनेमा देईल हे नक्की.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lalit prabhakar and neha mahajan starrer newmarathi movie ttmm will release soon