‘आसक्त’ संस्थेतर्फे ‘घंटा घंटा घंटा घंटा घंटा’ हे नवे नाटक रंगमंचावर येत असून त्यामध्ये प्रसिद्ध अभिनेता ललित प्रभाकर आणि मल्लिका सिंग हंसपाल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सॅम स्टायनर यांच्या मूळ लेखनाचे निरंजन पेडणेकर यांनी ‘घंटा घंटा घंटा घंटा घंटा’ या नावाने मराठीत रूपांतर केले आहे. आशीष मेहता निर्माता असलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक मोहित टाकळकर यांनी केले आहे. या नाटकाच्या निमित्ताने ललित प्रभाकर बऱ्याच कालखंडानंतर रंगमंचावर काम करतो आहे. पुण्यात कर्वे रस्त्यावरील ‘द बॉक्स’ येथे शुक्रवारी (१८ ऑगस्ट) रात्री ८ वाजता या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग होणार आहे.
हे एक कल्पित वास्तवातील नाटक असून त्यामध्ये फिरोजा आणि आदित्य हे जोडपे फॅसिस्ट राजवटीच्या देशात जीवनाचा अर्थ, प्रेम आणि राजकारण उलगडण्याच्या शोधात निघतात. देशात आलेल्या कठोर कायद्याने दैनंदिन शब्दांचा वापर १४० पर्यंत मर्यादित होतो आणि त्यामुळे त्यांच्या नातेसंबंधात काय ताणतणाव येतात याबद्दल हे नाटक एक गोष्ट सांगते. फिरोजा ही सरकारी वकील असून आदित्य संगीत कलाकार आहे. असे हे दोघे कायद्याच्या भीती आणि चिंतेने संवाद साधण्यासाठी धडपडत आहेत. या अराजकतेवर मात करू शकता येते का हे ते दोघेही पडताळून पाहत आहेत. हे नाटक स्त्री आणि पुरुष यांच्यातील प्रेमाच्या राजकारणाचा शोध घेते. आंदोलनकर्ता आणि सरकारी प्रतिनिधी यांना एकमेकांसमोर उभे करते. उपेक्षितांच्या संघर्षांतील प्रस्थापितांच्या भूमिकेला आव्हान देते. सर्वावर थोपवला गेलेला कायदा समाजाला एकत्रितपणे आणि व्यक्तिगत एका मनावर अशा दोन्ही पातळीवर परिणाम करतो. त्यातून ‘वैयक्तिक हेच राजकीय आहे’ याचा अर्थ नक्की काय हे शोधायचा नाटक प्रयत्न करते.