मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री नेहा महाजन यांच्या आगामी ‘तुझं तू माझं मी’ (‘टी टी एम एम’) या चित्रपटाचा दुसरे टिझर पोस्टर रिलीज करण्यात आले. पहिल्या टिझर पोस्टरमधून प्रेक्षकांना समुद्रकिनारी असलेल्या ललित आणि नेहा यांचा पाठमोरा फोटो पाहायला मिळाला होता. त्यानंतर आता नव्या पोस्टरमध्ये दोघे एकमेकांच्या पाठीला पाठ लावून बसल्याचे दिसते आहे. नव्या पोस्टरमध्ये पहिल्या टिझर पोस्टरमधील समुद्र आणि बॅकपॅक्स या दोन गोष्टीत साम्य दिसून येते. या पोस्टरमध्ये दोघांचा चेहरा स्पष्ट दिसत नसला तरी, प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढविण्याची क्षमता नक्कीच आहे.
काही दिवसांपूर्वी ललित आणि नेहा यांच्यात ट्विटरवर ‘कोल्ड वॉर’ रंगल्याचे पाहायला मिळाले. दोघांच्यात नक्की कशावरुन वॉर सुरु आहे, असा प्रश्नही त्यांच्या चाहत्यांना पडला. मात्र, आगामी ‘तुझं तू माझं मी’ (‘टी टी एम एम’) चित्रपटाच्या पहिल्या टिझर पोस्टरच्या प्रदर्शनानंतर ललित आणि नेहाच्या आगामी भेटीची ती चाहुल असल्याचे स्पष्ट झाले होते.
कुलदीप जाधव दिग्दर्शित आणि मीरा एण्टरटेनमेन्ट आणि वैशाली एण्टरटेनमेन्ट प्रस्तुत ‘टी टी एम एम’ चित्रपटामधील नेहा आणि ललितची धमाल जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झालीय. मीरा एण्टरटेनमेन्ट आणि वैशाली एण्टरटेनमेन्ट यांनी याआधी ‘मुंबई पुणे मुंबई’ आणि ‘प्रेमाची गोष्ट’ या चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ‘टी टी एम एम’ याचा आपल्या रोजच्या आयुष्यातला अर्थ पटकन लक्षात येतो, मात्र याच ‘टी टी एम एम’च्या काही वेगळ्या छटा ललित आणि नेहाच्या आगामी चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. डॉ. संतोष सवाणे निर्मित ‘टी टी एम एम’ हा चित्रपट १६ जून २०१७ रोजी प्रदर्शित होणार आहे.