बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांचा बहुचर्चित, बहुप्रतिक्षित ‘सूर्यवंशी’हा चित्रपट आज ५ नोव्हेंबरला देशभरातील सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून करोनामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. मात्र अखेर आज भारतासह इतर अनेक देशातील जवळपास ४ हजार स्क्रीन्सवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. दरम्यान हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दिग्दर्शक रोहित शेट्टीने सुटकेचा निश्वा:स सोडला आहे. अखेर शेवटची लढाई जिंकलो, अशा आशयाची पोस्ट त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

रोहित शेट्टीने करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर चित्रपट सर्वसामान्य वातावरणात प्रदर्शित होण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतली. यावेळी त्याने महाराष्ट्रात पूर्ण क्षमतेने चित्रपटगृह सुरु होण्यासाठी धावपळ केली. त्यानंतर यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन चित्रपटगृह सुरु करण्यासाठी विनंती केली. यानंतर चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी रोहितने चित्रपटगृहाच्या मालकांसोबतच महसूल विभागणीचा वाद सोडवला. यानंतर अखेर बहुप्रतिक्षित ‘सूर्यवंशी हा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

याबाबत गुरुवारी रात्री उशिरा रोहित शेट्टीने एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने म्हटले आहे की, “अखेर शेवटची लढाई जिंकलो. सूर्यवंशी भारतातील सर्व चित्रपटगृह आणि मल्टीप्लेक्समध्ये प्रदर्शित झाला. जे प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते ते आता ऑनलाइन तिकीट बुक करू शकतात. त्यामुळे आता मी दिवसातील पहिले जेवण जेवण्यासाठी घरी जात आहे. संपूर्ण चित्रपटसृष्टीला दिवाळीच्या शुभेच्छा,” असे रोहित शेट्टी म्हणाला.

दरम्यान निर्माते आणि चित्रपटगृहातील मालकांमध्ये चित्रपटाचा महसूल वाटून घेण्याच्या मुद्द्यावरून वाद झाला होता. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये चित्रपटाचे ऑनलाइन बुकिंग सुरू होत नव्हते. हे प्रकरण सोडवण्यासाठी रोहितला पूर्ण दिवस लागला. त्यामुळे तो दिवसभर उपाशी होता, असे त्याने स्वत: सांगितले. रोहित शेट्टीच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटल्यामुळे देशभरात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

आजपासून चित्रपटगृहात प्रदर्शित

‘सूर्यवंशी’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक हा चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट बघत आहे. मात्र कोरोनामुळे या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात येत होती. अखेर आज ५ नोव्हेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमारसोबत अजय देवगण आणि रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्याचसोबत बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Story img Loader