बॉलिवूडमध्ये सध्या जुन्या गाजलेल्या गाण्यांचं रिक्रियेटेड व्हर्जन करण्याचा ट्रेंड आला आहे. आतापर्यंत अनेक चित्रपटांच्या माध्यमातून जुन्या गाण्यांचे रिक्रियेटेड व्हर्जन केल्याचं पाहायला मिळालं आहे. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘टोटल धमाल’ या चित्रपटामध्येही काही गाण्यांचं रिक्रियेटेड व्हर्जन करण्यात आलं आहे. त्यातच या चित्रपटात ‘मुंगडा’ गाण्याचे रिक्रियेटेड व्हर्जन तयार करण्यात आलं असून हे गाणं गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना आवडलेलं नाही. याविषयी त्यांनी नाराजीही व्यक्त केली आहे.

काही दिवसांपूर्वीच ‘टोटल धमाल’ मधील ‘पैसा पैसा’ हे गाणे प्रदर्शित करण्यात आले होते. त्यानंतर आता ‘मुंगडा’ गाण्याचेही रिक्रियेटेड व्हर्जन प्रेक्षकांच्या भेटीला आलं. मात्र या गाण्याला प्रेक्षकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. ‘मुंगडा’ हे मूळ गाणं उषा मंगेशकर यांनी गायलं असून या गाण्याचं आता नवीन व्हर्जन आलं आहे. मात्र जुन्या गाण्यांच्या अशा व्हर्जनमुळे लता मंगेशकर नाराज झाल्या आहेत. एका मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांची नाराजीही व्यक्त केली आहे.

‘आमच्या काळात प्रत्येक गाणं विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक तयार केलं जायचं. प्रत्येक गाण्यातील बारकावे बघितले जायचे. मात्र आता तसं होत नसल्याचं दिसून येतं. कोणत्याही गाजलेल्या गाण्याचं असं रिक्रियेट करणं चुकीची गोष्ट आहे. विशेष म्हणजे आम्ही गायलेल्या गाण्यांचं रिक्रियेशन करताना आमचीसाधी परवानगीही कोणी घेत नाही’, असं लता मंगेशकर म्हणाल्या.

पुढे त्या असंही म्हणाल्या, ‘यापूर्वीही ‘मित्रो’ चित्रपटात त्यांच्या ‘चलते चलते’ गाण्याचे रिक्रियेटेड व्हर्जन तयार करण्यात आले होते. तेव्हादेखील आमची परवानगी घेण्यात आली नव्हती’.

‘सध्याच्या काळात होत असलेल्या अशा रिक्रियेट व्हर्जनमुळे आता संगीतक्षेत्रात नवीन गाणी बनविण्याचा आत्मविश्वासच उरला नाही’, अशी प्रतिक्रिया मुंगडा गाण्याचे संगीत दिग्दर्शक राजेश रोशन यांनी दिली.

दरम्यान, मुंगडाच्या रिक्रियेट व्हर्जनमध्ये अभिनेत्री सोनाक्षी झळकली आहे. तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट २२ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, सोनाक्षी सिन्हा, अनिल कपूर, माधुरी दिक्षित अशी तगडी स्टारकास्ट ‘ पाहायला मिळणार आहे.

Story img Loader