भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं आज निधन झालं. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण भारतात शोककळा पसरली आहे. लता मंगेशकर यांनी सगळ्यांची मने जिंकली होती. लता दीदींचे क्रिकेटवर असलेले प्रेम तर सगळ्यांनाच माहित आहे. मग ते १९८३ चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय टीमसाठी स्पेशल कॉन्सर्ट करून त्यांच्यासाठी पैसे गोळा करण्यापासून अनेक गोष्टी आहेत.
लता मंगेशकर गेल्या अनेक दशकांपासून सर्वांच्या आवडत्या आहेत आणि नेहमीच राहतील. लता मंगेशकर यांची जागा देशात कोणीच घेऊ शकणार नाही, असे सतत म्हटले जाते. लता मंगेशकर जितक्या संगीताचा सराव करायच्या, तितकीच त्यांना क्रिकेटची आवड होती. सुनील गावस्कर ते सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या त्या फॅन होत्या. १९८२ मध्ये भारतीय क्रिकेट टीम पाकिस्तानमध्ये मॅचसाठी खेळायला गेली होती. तेव्हा सुनील गावस्कर यांनी फक्त लता मंगेशकर यांना ओळखतो सांगत त्यांच्या अपमानाचा बदला घेतला होता.
Lata Mangeshkar Passes Away : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन
आणखी वाचा : धोनीच्या खूप मोठ्या चाहत्या होत्या लता मंगेशकर; निवृत्तीची बातमी ऐकताच केली होती विनंती
एक दिवस संध्याकाळी लाहोरमध्ये एका पार्टीचे आयोजण करण्यात आले होते. यावेळी सुनील गावस्कर देखील तिथे उपस्थित होते. दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, या पार्टीमध्ये अचानक एका महिलेने एण्ट्री केली होती. त्या महिलेची देहबोली आणि हावभाव पाहून सुनील गावसकर यांच्या लक्षात आले की ही महिला पाकिस्तानची सेलिब्रिटी आहे. तेव्हा संघाचे व्यवस्थापक बडोदा महाराज फतेहसिंह राव गायकवाड होते. त्या महिलेशी सुनील गावस्करची ओळख करून देत ते म्हणाले, “हे भारताचे कर्णधार आणि लोकप्रिय क्रिकेटपटू सुनील गावस्कर आहेत.”
आणखी वाचा : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं खरं नाव माहितीये का?
पुढे सुनील गावस्कर यांची ओळख ऐकल्यानंतर ती महिला म्हणाली, ‘मी यांना ओळखत नाही.. मी इम्रान आणि झहीर अब्बास यांना ओळखते.’ सुनील गावसकर यांना हे लगेच जाणवले की ती महिला असं का म्हणाली असेल. आता त्या महिलेची ओळख करून देण्याची वेळ होती. फतेहसिंह राव गायकवाड म्हणाले, “…आणि ही मलिका-ए-तरन्नुम नूरजहाँ आहे..तुम्ही त्यांना ओळखलेच असेल.” त्यावर सुनील गावस्कर यांनी नूरजहां यांच्याच अंदाजात उत्तर दिले म्हणाले, “नाही, मी त्यांना ओळखत नाही. मी फक्त लता मंगेशकरांना ओळखतो.”
PHOTOS: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याविषयी ‘या’ गोष्टी माहितीये का?
लता मंगेशकर यांना ८ जानेवारीला करोनाची लागण झाली होती. त्यासोबत त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाल्याचं समोर आलं होतं. लता मंगेशकर यांना करोनाची सौम्य लक्षण जाणवत होती. त्यामुळे त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्यानंतर २८ जानेवारीला त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढण्यात आलं होतं. मात्र ५ फेब्रुवारीला प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. त्यानंतर त्यांची प्रकृती खालवली.