भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं आज निधन झालं. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण भारतात शोककळा पसरली आहे. फक्त बॉलिवूड नाही तर सगळेच सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली देत आहेत. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडियन म्हणून ओळखला जाणारा अभिनेता समीर चौगुलेने देखील लतादीदींना सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे.
समीरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून लतादींदीचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत “निशब्द लतादीदी, अगदी काही दिवसांपूर्वी आपण मला फोन केला होतात आणि हे करोनाच संकट दूर झालं की आपण नक्की माझ्या घरी या आपण भेटू असं आमंत्रण दिलं होतं आणि आज? आसमंतातले लक्ष लक्ष सुर क्षणार्धात पोरके झाले. स्वरांची सरस्वती आम्हा भक्तांना पोरकी करून गेली. अख्या जगाला जगण्याची उमेद देणाऱ्या आवाजाला काही घटका आमच्या हास्यजत्रेने हसवलय हे आम्हा सर्वांचं भाग्य दीदी भावपूर्ण श्रद्धांजली”, असे कॅप्शन दिली आहे. लतादीदींनी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कॉमेडी शो पाहिल्यानंतर समीर चौगुलेला फोन केला होता.
आणखी वाचा : “पुन्हा लता मंगेशकर म्हणून जन्म नको कारण…”, लतादीदींचा जुना व्हिडीओ व्हायरल
लता मंगेशकर यांना ८ जानेवारीला करोनाची लागण झाली होती. त्यासोबत त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाल्याचं समोर आलं होतं. लता मंगेशकर यांना करोनाची सौम्य लक्षण जाणवत होती. त्यामुळे त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्यानंतर २८ जानेवारीला त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढण्यात आलं होतं. मात्र ५ फेब्रुवारीला प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. त्यानंतर त्यांची प्रकृती खालवली.
आणखी वाचा : धोनीच्या खूप मोठ्या चाहत्या होत्या लता मंगेशकर; निवृत्तीची बातमी ऐकताच केली होती विनंती
लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९४२ मध्ये होती आणि त्यांची कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून होती. त्यांनी ९०० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली होती. तसेच २० पेक्षा जास्त प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केले होते. लता मंगेशकर यांचे संपूर्ण कुटुंबच संगीतासाठी प्रसिद्ध आहे. सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते.