आपल्या गाण्यांनी सर्वांना वेड लावणाऱ्या लता मंगेशकर आता आपल्यात नाहीत. आपल्या आवाजाने सर्वांची मने जिंकणाऱ्या लता मंगेशकर यांचा आवाज कायमचा नि:शब्द झाला. रविवारी (६ फेब्रुवारी) सकाळी १० च्या सुमारास लता मंगेशकर यांच्या निधनाच्या वृत्ताने सर्वांनाच धक्का बसला. लता मंगेशकर गेल्या महिनाभरापासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत होत्या. यादरम्यान त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर प्रतीत समदानी यांनी अखेरच्या क्षणी त्यांची अवस्था नेमकी कशी होती? याबद्दलची माहिती दिली आहे.
“लतादीदींच्या चेहऱ्यावर शेवटच्या क्षणी एक गोड हसू होते. मी गेल्या ३ वर्षांपासून लता मंगेशकर यांच्यावर उपचार करत आहेत. जेव्हा कधी लतादीदींची तब्येत बिघडायची तेव्हा मी त्यांच्यावर उपचार करायचो. मात्र यावेळी त्यांची प्रकृती ही दिवसेंदिवस खालावत गेली. आम्ही खूप प्रयत्न केले, पण शेवटी त्यांना वाचवू शकलो नाही,” असे डॉ. प्रतीत समदानी म्हणाले.
त्यापुढे ते म्हणाले की, “लता मंगेशकर जेव्हा कधी रुग्णालयात यायच्या तेव्हा त्या नेहमी म्हणायच्या की सर्वांची योग्य काळजी घेतली पाहिजे. त्यासोबत जे काही उपचार आवश्यक असतात ते करण्यास त्या नेहमीच तयार असायच्या आणि त्यांनी कधीही हार मानली नाही. त्याचे हसणे मला आयुष्यभर लक्षात राहील. शेवटच्या क्षणीही त्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं. मात्र, गेल्या काही वर्षांपासून त्यांची तब्येत बरी नसल्याने त्या अनेकांना भेटू शकल्या नाहीत.”
“मी जेव्हा त्यांच्यावर उपचार करायचो, तेव्हा लतादीदी फार कमी बोलायच्या. पण देवाच्या मनात काही तरी वेगळंच होतं. त्यामुळेच त्या आपल्याला कायमच्या सोडून गेल्या”, असेही डॉक्टरांनी सांगितले.
लता मंगेशकर नेहमी पांढऱ्या रंगाची साडी का परिधान करायच्या? स्वत: सांगितले होते कारण
लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९४२ मध्ये होती आणि त्यांची कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून होती. त्यांनी ९०० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली होती. तसेच २० पेक्षा जास्त प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केले होते. लता मंगेशकर यांचे संपूर्ण कुटुंबच संगीतासाठी प्रसिद्ध आहे. सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते.