गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना करोनाची लागण झाल्याने सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयातील आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांना करोनाची सौम्य लक्षणं जाणवत आहेत. त्या अद्याप आयसीयूमध्ये आहेत. त्या लवकरात लवकर बरे व्हाव्यात यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
लतादीदींच्या तब्येतीत सध्या सुधारणा होत आहेत. पण अद्याप त्या आयसीयूमध्येच असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांची तब्येत खालवली असल्याचे वृत्त समोर आलं होतं. मात्र लतादीदींच्या प्रवक्त्यांनी हे वृत्त नाकारले होते. लता मंगेशकर यांच्या प्रवक्त्या अनुषा श्रीनिवासन अय्यर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या लतादीदींची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांनी परवानगी दिल्यानंतर त्यांना घरी आणले जाईल.
सध्या त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर सतत त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. तसेच त्या अद्याप आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. लता मंगेशकर यांच्यावर उपचार करत असलेले डॉ. प्रतित समदानी म्हणाले की, वृद्धापकाळामुळे त्यांना बरे होण्यासाठी वेळ लागत आहे. त्या अद्यापही आयसीयूमध्ये आहेत. त्या लवकरात लवकर बरे व्हाव्यात यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. सध्या त्यांना भेटण्याची कोणालाही परवानगी नाही. लता मंगेशकर यांच्या घरातील एक कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यानंतर लतादीदींनाही संसर्ग झाला, अशी माहिती समोर येत आहे.
याआधीही नोव्हेंबर २०१९ मध्ये लतादीदींना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांना न्युमोनियाची लागण झाली होती. त्यावेळी त्यांना २८ दिवसांनी डिस्चार्ज देण्यात आला होता.