भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं काल ६ फेब्रुवारी रोजी निधन झालं. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण भारतात शोककळा पसरली आहे. काल लतादीदींच्या अंत्यसंस्काराला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत अनेक बड्याबड्या लोकांनी हजेरी लावली होती. मात्र, त्या सगळ्या मान्यवरांमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील एकही कलाकार उपस्थित नव्हते असं का? असा प्रश्न करणाऱ्या नेटकऱ्यांना मराठी अभिनेत्री हेमांगी कवीने सडेतोड उत्तर दिले आहे.
काल संध्याकाळी शिवाजी पार्कवर लतादीदींचं अंत्यसंस्कार करण्यात आलं. यावेळी अनेक बॉलिवूड कलाकार उपस्थित होते. तर मराठी कलाकार आज तिथे का नव्हते, असा प्रश्न नेटकऱ्यांनी केल्यानंतर हेमांगीने उत्तर दिले आहे.
आणखी वाचा : व्हेंटिलेटवर असताना ईअरफोन मागवून लतादीदी ऐकत होत्या ‘या’ व्यक्तीची गाणी
हेमांगी कमेंट करत म्हणाली, “सरकारी प्रोटोकॉल्स आड आले. मला गेटमधून आत जाऊ दिलं नाही. खूप विनंती केली. मला या गेटवरून त्या गेटवर जा म्हणत राहिले. शेवटी एका पीएसआय साहेबांना माझी दया आली आणि मला लपून लपून कसा बसा प्रवेश मिळवून दिला. नंदेश उमप, मी आणि अभिजीत केळकर ४ वाजल्यापासून तिथं होतो. शेवट पर्यंत आम्हांला विनंती करून ही दर्शन मिळत नव्हतं. संगीताचे खरे वारसदार गायक शान, शैलेंद्र सिंग, बेला शेंडे, कविता पौडवाल यांना ही मागे हटकलं जात होतं, तिथं माझी काय गत!”
आणखी वाचा : पाकिस्तानने काश्मिरच्या बदल्यात केली होती लतादीदींची मागणी
पुढे हेमांगी म्हणाली, “आम्ही तिथे कुणी सेलिब्रीटी म्हणून गेलोच नव्हतो. एक निस्सीम रसिक म्हणूनच गेलो होतो. आम्हांला ही शासकीय प्रोटोकॉल्स कळत होते, म्हणून थांबून होतो. पण नंतर आम्हांला सांगितलं वेळ नाहीये आता जवळून दर्शन मिळणार नाही. अक्षरशः भांडून आम्ही शेवटचं दर्शन घेतलं! कदाचित याची कल्पना काही लोकांना असावी म्हणून कुणी आलं नसावं.”
आणखी वाचा : “पुन्हा लता मंगेशकर म्हणून जन्म नको कारण…”, लतादीदींचा जुना व्हिडीओ व्हायरल
लतादीदींनी त्यांच्या करिअरमध्ये ३० हजार पेक्षा जास्त गाणी गायली आहेत. लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९४२ मध्ये होती आणि त्यांची कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून होती. काल लतादीदींवर मुंबईतील दादर परिसरात असलेल्याशिवाजी पार्क इथे अंत्यसंस्कार करण्यात आले.