जीवनात घडलेल्या खऱ्या गोष्टी आत्मचरित्रातून सांगायच्या असतात. माझ्या आजवरच्या जीवनातील खऱ्या गोष्टी सांगायच्या म्हटल्या, तर त्यामुळे खूप जण दुखावले जाण्याची शक्यता आहे. तसेच त्यात उल्लेख केलेल्या अनेक व्यक्ती आता हयात नाहीत. त्यामुळे अशा परिस्थितीत आत्मचरित्र लिहिणे मला योग्य वाटत नाही, असे प्रतिपादन गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांनी येथे केले.
 ‘मैत्र’ फाउंडेशन तर्फे प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात पद्मा सचदेव यांच्या मूळ पुस्तकाचा जयश्री देसाई यांनी केलेला अनुवाद ‘अक्षय गाणे’ या पुस्तकाच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आला. त्या वेळी लताजी बोलत होत्या. ज्येष्ठ गायक संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या वेळी व्यासपीठावर ‘मैत्र प्रकाशन’च्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालिका वर्षां सत्पाळकर, चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते आशुतोष गोवारीकर, मूळ लेखिका पद्मा सचदेव, रचना खडीकर-शहा आणि मैत्र प्रकाशनचे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर मिलिंद गुणाजी उपस्थित होते.
लतादीदीने आता आत्मचरित्र लिहावे, असा उल्लेख पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी आपल्या भाषणात केला. त्यावर उत्तर देताना, लताजींनी बाळासाहेब ठाकरे यांची एक आठवण सांगितली. ठाकरे यांना ज्या वेळी विचारले की, तुम्ही आत्मचरित्र का लिहित नाहीत. त्या वेळी बाळासाहेबांनी उत्तर दिले होते की, माझे आत्मचरित्र कपाटात धूळ खात पडून राहावे, असे मला वाटत नाही. आपल्या आत्मचरित्राबाबतही आपल्याला तसेच वाटते, असे त्या म्हणाल्या. तसेच आत्मचरित्रात ज्यांचा नावांचा उल्लेख केला असता त्या व्यक्ती आता हयात नसल्याने त्यांच्यावर प्रेम करणारे रसिक ‘आता हे हयात नसल्याने दीदी काहीबाही लिहित आहेत,’ असे म्हणू शकतील. हा धोका टाळण्यासाठीच मी आत्मचरित्र लिहिणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. या वेळी पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी, हे पुस्तक म्हणजे लतादीदीचे स्मृतिचरित्र आहे, असा उल्लेख केला. भगवान श्रीकृष्ण, श्रीराम, साहित्याच्या प्रांतात संत ज्ञानेश्वर हे जसे कालातीत आहेत, तसेच लता मंगेशकर हे संगीतक्षेत्रातील कालातीत व्यक्तिमत्त्व आहे, असेही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा