गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीदेखील #MeToo मोहिमेवर आपलं मत व्यक्त केलं असून प्रत्येक महिलेला सन्मान दिला पाहिजे असं म्हटलं आहे. सध्या देशभरात #MeToo चं वादळ असून याचा सर्वात जास्त फटका बॉलिवूडला बसला असून अनेक सेलिब्रेटींची नावे समोर आली आहेत. कोणीही महिलांशी चुकीचं वागू नये, आणि जर कोणी असं वागलंच तर मोकळीक मिळू नये. अशा व्यक्तींना शासन झालंच पाहिजे असं लता मंगेशकर यांनी म्हटलं आहे. आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केलं आहे.
लतादीदींनी म्हटलं आहे की, ‘मला मनापासून वाटतं काम करणाऱ्या महिलांना आदर, सन्मान आणि योग्य ती जागा मिळाली पाहिजे. जर कोणी त्यांना हे सर्व देण्यास नकार देत असेल तर त्यांना धडा शिकवला पाहिजे’. पुढे त्या म्हणाल्या आहेत की, ‘कोणीही महिलांशी चुकीचं वागू नये, आणि जर कोणी असं वागलंच तर मोकळीक मिळू नये. अशा व्यक्तींना शासन झालंच पाहिजे’.
#MeToo मोहिमेमुळे अनेक दिग्गज कलाकारांचे पितळ उघडे पडले आहे. अभिनेत्री तनुश्री दत्तामुळे बॉलिवूडमध्ये खऱ्या अर्थाने #MeToo मोहिम सुरु झाली असं म्हणावं लागेल. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर अभिनेत्री तनुश्री दत्ताने गैरवर्तणुकीचा आरोप केला. ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटातील एका गाण्याच्या चित्रीकरणावेळी नानांनी गैरवर्तन केल्याचं तनुश्रीने म्हटलं आहे. यानंतर अनेक सेलिब्रेटींनी आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडली आहे.
चेतन भगत, आलोकनाथ, विकास बहल, साजिद खान, विवेक अग्निहोत्री, रजत कपूर, कैलाश खेर यांच्यासहित अनेकांची नावं समोर आली आहेत. फरहान अख्तर, अक्षय कुमार, ह्रतिक रोशन यांच्यासारख्या अभिनेत्यांनी आरोप झालेल्यांविरोधात काम करण्यास नकार दिला आहे. महिला दिग्दर्शकांनीही अशा सेलिब्रेटींसोबत काम न करण्याचा कठोर निर्णय घेतला आहे.