महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम घराघरात लोकप्रिय आहे. जीवनात कितीही टेन्शन, ताण असला तरीदेखील सारं काही ठाराविक काळासाठी विसरायला लावणारा कार्यक्रम म्हणून या कार्यक्रमाने विशेष ओळख निर्माण केली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या कार्यक्रमातील कलाकार प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करताना दिसत आहे. या कार्यक्रमातील कलाकारांच्या अभिनयाचे अनेक सेलिब्रिटीही चाहते आहेत. बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यानंतर आता गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे आणि त्यातील विनोदवीरांचे कौतुक केले आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील अभिनेता समीर चौगुले आणि विशाखा सुभेदार यांनी खास पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर नेहमी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम पाहतात. त्या या कार्यक्रमाच्या फार मोठ्या चाहत्या आहेत. या कार्यक्रमातील सर्वच कलाकारांचे विनोद त्यांना प्रचंड आवडतात.
याच निमित्ताने लता मंगेशकर यांनी समीर चौगुले आणि विशाखा सुभेदार यांच्यासाठी खास भेटवस्तू पाठवली आहे. तसेच या भेटवस्तूंवर लता मंगेशकर यांनी स्वत:च्या हस्ताक्षरात शुभेच्छा संदेशही लिहिला आहे. लता मंगेशकर यांनी कशाप्रकारे कार्यक्रमाचे कौतुक केलं याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी माहिती दिली आहे.
समीर चौगुले यांची पोस्ट
समीर चौगुले यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टसोबत त्यांनी लता मंगेशकर यांनी दिलेल्या भेटवस्तूसोबत दोन फोटोही शेअर केले आहेत. त्या भेटवस्तूवर “श्री चौगुले नमस्कार, लेखक/ डायरेक्शन आणि सुंदर अभिनयाच्या देवाची पूर्ण कृपा यालाच म्हणतात. माझ्या अनेक शुभेच्छा…लता मंगेशकर” असा संदेश लिहिण्यात आला आहे. या संदेशानंतर समीर चौगुले यांनी छान पोस्ट लिहित लता मंगेशकरांचे आभार मानले आहेत.
“निसर्ग किती ग्रेट आहे न ! शब्द संपले की भावनांना वाट मिळावी म्हणून त्याने अश्रूंची निर्मिती केली…आज ते प्रकर्षाने जाणवलं…आज सुरांची आणि स्वरांची सरस्वती आदरणीय लता मंगेशकर दीदींनी अत्यंत प्रेमाने घरी एक भेटवस्तू आणि माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी ट्रॉफी पाठवली. आणि ती ट्रॉफी म्हणजे दिदींच्या हस्ताक्षरातील शुभेच्छा आणि आशीर्वाद….थिजून जाणं म्हणजे काय ते आज मला कळलं..लतादीदी महाराष्ट्राची हास्यजत्रा नेहमी बघतात आणि खूप हसतात….एन्जॉय करतात ही आम्हा महाराष्ट्राची हास्यजत्रा कुटुंबियांसाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. हा सुवर्ण क्षण आयुष्यात आला तो फक्त आणि फक्त आमच्या हास्यजत्रा कुटुंबामुळे..,” असे समीर चौगुले म्हणाले.
हेही वाचा : #BanLipstick नक्की काय आहे? तेजस्विनी पंडीतने सांगितले कारण, म्हणाली…
“मनःपूर्वक आभार सोनी मराठीचे हेड श्री. अजय भालवणकरसर, नॉन फिक्शन हेड अमित फाळकेसर, ईपी गणेश सागडे, सिद्धूगुरू जुवेकर . आणि आमचं विद्यापीठ सचिन गोस्वामी सर आणि सचिन मोटे सर………ज्यांच्या मार्गदर्शनाशिवाय हे केवळ अशक्य होतं …आणि खास आभार माझी पार्टनर विशाखा सुभेदार ..vishu आपल्या जोडीच्या यशात तुझा खूप मोठा वाटा आहे..तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे… विशाखा सुभेदार धन्यवाद… आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या संपूर्ण कुटुंबाला फार मोठं धन्यवाद…अमीर हडकर आणि संपूर्ण बँड, दिग्दर्शन टीम, प्रोडक्शन टीम backstage चे सगळे कलाकार आणि प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर तुमच्या सपोर्टसाठी धन्यवाद आणि आमची लाडकी प्राजक्ता या मागे तुझ्या ‘वा दादा वा’ चा ही खूप मोठा हात आहे आणि मयुरेश पई धन्यवाद…..भरून पावलो..आयुष्य सार्थकी लागलं. रसिकांनो असाच आशीर्वाद कायम पाठीशी राहू दे.,” असेही समीर चौगुले यांनी यात म्हटलं.