गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना करोनाचा संसर्ग झाल्यामुळे मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत असून त्यांना ICUमध्ये ठेवण्यात आले आहे. सर्वजण लातादीदी यांच्या प्रकृतीविषयी काळजी करत आहे. अशातच त्यांच्यावर उपचार करत असणाऱ्या डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृती विषयी माहिती दिली आहे.
‘गायिका लता मंगेशकर सध्या आयसीयूमध्ये आहेत. पण त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली आहे’ अशी माहिती दीदींवर उपचार करत असलेले डॉक्टर प्रतीत समदानी यांनी दिली आहे.
आणखी वाचा : लतादीदी ऑक्सिजन सपोर्टवर, डॉक्टरांसह कुटुंबियांनी दिली प्रकृतीविषयी माहिती
यापूर्वी लता मंगेशकर यांची भाची रचना शहा यांनी दीदींच्या प्रकृती विषयी माहिती दिली होती. ‘लतादीदी यांना कोविड-19 ची सौम्य लक्षणे जाणवत आहेत. पण त्यांची प्रकृती आणि वय लक्षात घेता खबरदारी म्हणून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्यावर डॉक्टरांची सर्वोत्कृष्ट टीम उपचार करत आहे. लतादीदी या सध्या ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. पुढील काही दिवस त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे’ अशी माहिती रचना यांनी दिली होती.
लता मंगेशकर यांच्या प्रकृतीविषयी माहिती देताना भजनसम्राट अनूप जलोटा यांनी नवभारत टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार, आम्ही लताजींशी अनेकदा फोनवर बोलत असतो. मी अनेकदा त्यांच्याशी व्हॉट्सअॅपद्वारे बोलतो. पण आजकाल त्या कोणालाच भेटत नाही. कारण वयोमानानुसार त्यांना लवकर संसर्ग होण्याची शक्यता होती. गेल्यावेळी हॉस्पिटलमधून घरी आल्यापासून त्या त्यांच्या खोलीतच असायच्या. त्या कोणत्याही बाहेरच्या लोकांना भेटलेल्या नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्याशी फोनवरून संपर्कात राहतो. त्यांना आता झालेल्या करोनाबाबत घाबरण्यासारखे काहीही नाही. त्यांना सुरक्षेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर व्यवस्थित उपचार होतील.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लता मंगेशकर यांना सध्यातरी कोणत्याही व्हेंटिलेटर सपोर्टची गरज नाही. लता मंगेशकर या ब्रीच कॅण्डी रुग्णालयातील डी वॉर्डमध्ये दाखल आहेत. त्या वॉर्डातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, लता मंगेशकर या काही इतर काही वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात आल्या होत्या. मात्र उपचारादरम्यान त्यांना करोनाची लागण झाली.