गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं आहे. त्यानंतर त्यांच्या चाहत्यांपासून ते अगदी बॉलिवूड सेलिब्रेटींपर्यंत सर्वच लतादीदींच्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहेत. लतादीदींच्या गाण्यांचे असंख्य चाहते आहेत. त्यांच्या निधनानंतर आता त्यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात बिग बी अमिताभ बच्चनपासून ते दिग्गज अभिनेता ऋषी कपूर यांच्यापर्यंत अनेक प्रसिद्ध कलाकार चक्क जमिनीवर बसून लतादीदींचं गाणं ऐकताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर व्हायरल झालेला लता मंगेशकर यांचा हा व्हिडीओ त्या काळातील आहे. जेव्हा अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, शशी कपूर यांच्यासारखे कलाकार बॉलिवूडवर राज्य करत होते. लतादीदींचे चाहते हा व्हिडीओ पाहिल्यांनतर त्या काळाला ‘गोल्डन एरा’ असं म्हणताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये ऋषी कपूर, अमिताभ बच्चन, झीनत अमान, शर्मिला टैगोर, वहिदा रहमान, शशी कपूर, रणधीर कपूर, विनोद खन्ना यांच्यासारखे प्रसिद्ध कलाकारही जमिनीवर बसून लतादीदींचं गाणं ऐकताना दिसत आहेत. तर लता मंगेशकर ‘कभी कभी मेरे दिल में…’ हे गाणं गाताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ इ-टाइम्सनं ट्विटरवर शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये लतादीदी गात असलेलं ‘कभी कभी मेरे दिल में…’ हे गाणं यश चोप्रा दिग्दर्शित ‘कभी कभी’ या चित्रपटातील आहे. या चित्रपटात अभिनेता अमिताभ बच्चन, शशी कपूर, वहिदा रहमान, ऋषी कपूर आणि नीतू सिंह हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. १९७६ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात लतादीदी आणि मुकेश यांनी हे गाणं गायलं होतं. तर संगीत खय्याम यांचं होतं. साहिर लुधियानवी यांनी हे गाणं लिहिलं होतं.

दरम्यान लता मंगेशकर यांना या वर्षी जानेवारी महिन्यात करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याचवेळी त्यांना न्युमोनियाचीही लागण झाली. त्या जवळपास १ महिना रुग्णालयात होत्या. त्यांना काही काळ व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. पण ६ फेब्रुवारीला त्यांनी अखेरचा श्वास घेतला.