पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांसाठी गाणसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी १ कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. ‘भारत के वीर’च्या माध्यमातून ही मदत करणार असल्याची माहिती मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा नातू आदिनाथ मंगेशकर यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फेब्रुवारी महिन्यात तब्बल ३५० किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी पुलवामा जिल्ह्यातील केंद्रीय राखीव पोलीस दलावर हल्ला केला होता. या हल्ल्यात ४० पेक्षा अधिक जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर कलाविश्वातील अनेकांनी शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी मदतीचा हात पुढे केला होता. त्यानंतर आता लता मंगेशकर यांनीदेखील १ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या व्यतिरिक्त मंगेशकर कुटुंबीय आणि त्यांचा मित्रपरिवारही ११ लाख रुपयांची मदत करणार आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या मास्टर दीनानाथ पुरस्कारांच्या घोषणेवेळी ही मदत जाहीर करण्यात आली. यावेळी लता मंगेशकर, उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर उपस्थित होते.

दरम्यान, यंदाच्या या पुरस्कार सोहळ्यात सलिम खान यांना जीवन गौरव पुरस्कार बहाल करण्यात येणार आहे. तसेच वीर मरण आलेल्या जवानांच्या कुटुंबियांना मदत करणाऱ्या ‘भारत के वीर’ संस्थेला १ कोटी रुपयांची मदत केली जाणार आहे. मोहन भागवत यांच्या हस्ते दीनानाथ मंगेशकर पुरस्काराचे वितरण होणार आहे. यंदाच्या पुरस्काराचे मानकरी पुढील प्रमाणे आहेत –

1) संगीत- सुचेता ताई भिडे चाफेकर
2) जीवन गौरव – सलिम खान, लेखक
3) सिनेमा – मधुर भांडारकर
4) ( outstanding contribution in cinema) – हेलनजी
5)वागविलसिनी ( साहित्य) – वसंत आबाजी ढहाके
6) मोहन वाघ पुरस्कार – मराठी नाटक ( भद्रकाली प्रोडक्शन – सोयरे सकळ )
7) विशेष पुरस्कार – भारत के वीर संस्थेला दिला जाईल. सीआरपीएफ अधिकारी स्वीकारणार पुरस्कार

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lata mangeshkar to donate rs 1 crore to the families of pulwama attack martyrs