‘थ्री इडियट्स’ फेम ज्येष्ठ अभिनेते अखिल मिश्रा यांचं दोन दिवसांपूर्वी निधन झालं. त्यांनी ‘थ्री इडियट्स’मध्ये ग्रंथपाल दुबेची भूमिका केली होती. ते स्वयंपाकघरात एका स्टूलवर चढून काहीतरी करण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा ते खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं पण ते वाचू शकले नाही. या दुखःद घटनेनंतर त्यांची पत्नी सुझान बर्नर्टने भावुक पोस्ट शेअर केली आहे.
“हे आम्ही होतो, नेहमी एकमेकांशी बोलण्यात गुंतलेले, कित्येकदा तर फक्त एका नजरेने…तू माझा होतास आणि मी तुझी होते. तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रेमामुळे मी भारावून गेले आहे आणि माझी इच्छा आहे की तुम्हा सर्वांच्या प्रेमाने त्याच्या आत्म्याला ते जिथे लाटेसारखे जात आहे तिथे घेऊन जावे…
सर्व मेसेजेससाठी मी सर्वांचे आभार मानते. मला आशा आहे की तुम्ही समजून घ्याल मी सर्वांना उत्तर देऊ शकत नाही, पण मी कमेंट्स वाचत आहे आणि तुमचं प्रेम व हिंमत घेत आहे ..
सहसा मी ही पोस्ट अखिलला त्याचे मत विचारण्यासाठी दाखवते.. यात काहीतरी अॅड करण्यासाठी किंवा स्पष्ट करण्यासाठी…आता मी यापुढे करू शकणार नाही…”, असं सुझानने लिहिलंय. सोबतच तिने दोघांचा एक फोटोही शेअर केला आहे.
दरम्यान, अखिल मिश्रांचा जेव्हा घरात अपघात झाला तेव्हा सुझान बर्नर्ट या एका प्रोजेक्टच्या शूटिंगसाठी हैदराबादमध्ये होत्या. तिथेच त्यांना अपघाताची माहिती मिळाली आणि त्या परत मुंबईत आल्या होत्या. पतीच्या अचानक निधनाने सुझान यांना धक्का बसला आहे.
अखिल मिश्रा यांनी ‘हजारों ख्वाहिशे ऐसी, ‘वेल डन अब्बा’, ‘कलकत्ता मेल’ आणि शाहरुख खानचा ‘डॉन’ यांसारख्या चित्रपटांमध्येही त्यांनी काम केलं होतं. ‘दो दिल बंधे एक डोरी से’, ‘उत्तरन’, ‘परदेस में मिला कोई अपना’ आणि ‘श्रीमान श्रीमती’ यासारख्या टेलिव्हिजन कार्यक्रमातही ते दिसले होते. त्यांची पत्नी जर्मन अभिनेत्री सुझान बर्नर्ट यांनी ‘अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’मध्ये काम केलं होतं.