मागील काही दिवसांपासून नर्तिका गौतमी पाटील विविध कारणांमुळे चर्चेत आहे. ती अश्लील नृत्य करते, असा आरोप अनेकांनी केला असून तिच्या कार्यक्रमांवर बंदी घालावी, अशी मागणीही लोकांनी केली आहे. इतकंच नव्हे तर बऱ्याचदा तिला यासाठी जाहीरपणे माफीदेखील मागायला लागली होती. आता नुकतंच गौतमीवर पुन्हा एकदा माफी मागायची वेळ आली आहे. मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीसुद्धा गौतमी पाटीलच्या वादात उडी घेतली होती.
“लावणी किंवा इतर कोणतेही कार्यक्रम सर्वांना पाहता येतील, अशा प्रकारे आयोजित केले पाहिजे. अशा कार्यक्रमांमध्ये अश्लील प्रकार घडता कामा नयेत. काही जिल्ह्यांमध्ये अशा कार्यक्रमांवर बंदी आहे. पण काही जिल्ह्यात असे कार्यक्रम सुरू आहे. मी संबंधितांशी बोलणार आहे. वेळ पडली तर येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशानात हा मुद्दा उपस्थित करणार आहे.” अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली होती. मोडलिंबमधील एका कार्यक्रमात गौतमी पाटीलने हजेरी लावली होती, या दरम्यान तिने पत्रकारांशी संवाद साधला.
आणखी वाचा : आकाश ठोसर करणार सायली पाटीलसह रोमान्स; ‘घर, बंदुक, बिरयानी’मधील पहिल्या गाण्याचा टीझर प्रदर्शित
गौतमीने तिचे जुने व्हिडिओ पुन्हा व्हायरल करण्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ती म्हणाली, “राती अर्ध्या राती हे गाणं सादर करताना माझ्याकडून खूप चुका झाल्या, त्या मी मान्य करते आणि त्याबद्दल मी जाहीर माफीदेखील मागितली आहे. तरीसुद्धा माझे जुने व्हिडिओ व्हायरल करून मला प्रचंड ट्रोल केलं जात आहे, हे मला अजूनही समजलेलं नाही. आता माझा पोषाखही नीट असतो, मी कसलेही विचित्र हावभाव करत नाही. तरी मला का ट्रोल करतात हे कळत नाही.”
इतकंच नाही तर अजित पवारांचा उल्लेख करत गौतमीने आता ती सुधारली असल्याचंही नमूद केलं. त्यामुळे सतत तिचे जुने व्हिडिओ व्हायरल करून तिला बदनाम करू नका अशी विनंती गौतमीने यादरम्यान केली आहे. गौतमीची जुने व्हिडिओज आजही सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. आता गौतमीमध्ये नक्कीच सुधारणा झाली आहे की नाही ते येणारा काळच ठरवेल.