गेल्या अनेक दिवसांपासून ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर कोल्हापुरी ठसक्यात ‘लक्ष्मे अगं ए लक्ष्मे’ अशी हाक सतत ऐकू येते आहे. ही लक्ष्मी म्हणजेच ‘ढोलकीच्या तालावर’ या शोमधून पुढे आलेली समृद्धी केळकर ही अभिनेत्री. तसंच गेले अनेक दिवस छोटय़ा पडद्यापासून लांब असलेले कलाकार ओमप्रकाश शिंदे आणि सुरभी हांडे हे त्रिकूट ‘लक्ष्मी सदैव मंगलम’ या नव्या मालिकेतून लोकांसमोर आलं आहे. प्रेक्षकांची मनं जिंकण्यात ही मालिका यशस्वी ठरली असून नुकतेच मालिकेने १०० भाग पूर्ण केले आहेत.
१०० भाग पूर्ण केल्यानिमित्त मालिकेच्या सेटवर जंगी सेलिब्रेशन झालं. यावेळी संपूर्ण टीम उपस्थित होती आणि केक कापून कलाकारांनी हा आनंद साजरा केला. तीन वेगळ्या व्यक्तिरेखा, तीन वेगळी व्यक्तिमत्त्वं आणि त्यांचा अनोखा प्रवास अशा धाटणीची ही मालिका आहे.
वाचा : मराठीत लेखकाला पहिल्यांदाच नफ्यातला दहा टक्के वाटा
‘जय मल्हार’ या पौराणिक मालिकेमधून म्हाळसाच्या भूमिकेत लोकप्रिय झालेली अभिनेत्री सुरभी हांडे या मालिकेमधून तिच्या पौराणिक प्रतिमेला छेद देत एका नव्या रूपात दिसत आहे.
या मालिकेविषयी निर्माते म्हणाले की, ‘लक्ष्मी सदैव मंगलम’ ही मालिका शहर आणि गाव यांच्यातील दुरावा कमी करणारी मालिका आहे. शहरातल्या धुसमुसळ्या प्रेमाला अस्सल ग्रामीण प्रेमाने रंगवणाऱ्या या मालिकेमध्ये आम्ही अतिशय निरागस आणि अवखळ अशा लक्ष्मीचा प्रवास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मालिकेमध्ये अनुभवी कलाकारांचा संच आणि अनोखी संकल्पना असल्यामुळे ही मालिका नक्कीच प्रेक्षकांना आवडेल अशी मला खात्री होती.’