चालू वर्षी अनेक नवनवीन आशय-विषयांचे चित्रपट मराठीत झळकणार आहेत. मराठी चित्रपटाच्या रूपेरी पडद्यावर प्रथमच फॅशन विश्व, फॅशन डिझायनर्सची तीव्र स्पर्धा पाहायला मिळणार आहे. अंकुर काकतकर दिग्दर्शित ‘एलबीडब्ल्यू’ असे या चित्रपटाचे नाव असून नुकतेच या चित्रपटाच्या पोस्टर अनावरणाने मुहूर्त करण्यात आला आहे. जितेंद्र जोशी आणि अमृता खानविलकर फॅशन डिझायनर्सच्या मुख्य भूमिकांत झळकणार आहेत. सुशांत शेलारचीही प्रमुख भूमिका आहे. मधुर भांडारकरच्या ‘फॅशन’शी आपल्या चित्रपटाचा काहीही सबंध नाही.
फॅशनचे जग जवळून पाहात असल्यानेच फॅशनचे विश्व, फॅशन डिझायनरची मानसिकता, त्यांच्यातील स्पर्धा, रोमान्स, आपल्या प्रथा-परंपरांचा वेगळ्या पद्धतीने विचार करणाऱ्या व्यक्तिरेखा मराठीत आणत असल्याचे ‘एलबीडब्ल्यू’चे दिग्दर्शक अंकुर काकतकर यांनी सांगितले.
‘देख भाई देख’ मालिकेप्रमाणे फॅमिली कॉमेडी हा प्रकार मराठी प्रेक्षकांना पाहायला मिळेल. त्याचबरोबर प्रेम त्रिकोणही असून फॅशन डिझायनर्सचे विश्व असल्यामुळे आपला सिनेमा तरुणाईला भिडेल अशा पद्धतीने त्याची मांडणी असेल, असे काकतकर यांनी सांगितले.
मिलिंद फाटक लिखित ‘एलबीडब्ल्यू’चे ‘युथफूल’ संगीत हे वैशिष्टय़ ठरणार असून अमित राज, नीलेश मोहरीर, वैभव पंच, पंकज पद्मनाभ असे चार संगीत दिग्दर्शक आहेत.
अन्य महत्त्वाच्या भूमिकांत ऋतुराज फडके, सुत्रित्रा बांदेकर, संजय मोने, सुहास जोशी, सुलेखा तळवलकर, स्नेहा देशमुख, आशिष कुलकर्णी झळकणार आहेत. संदीप नाडंगे निर्माते असून मुक्ता ठक्कर सहाय्यक निर्मात्या आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 4th Feb 2014 रोजी प्रकाशित
मराठी चित्रपटात प्रथमच फॅशन विश्व
चालू वर्षी अनेक नवनवीन आशय-विषयांचे चित्रपट मराठीत झळकणार आहेत.
First published on: 04-02-2014 at 06:18 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lbw new marathi movie