महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘ले पंगा’ गाण्याने केवळ भारतातच नव्हे तर परदेशातदेखील धूम माजवली आहे. तसा उल्लेख अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये केला आहे. ‘प्रो कब्बडी लीग’च्या प्रसिद्धीसाठी सदर गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. वयाच्या ७२व्या वर्षी ‘बिग बीं’नी संगीतक्षेत्रातील आपले कौशल्य दाखवून दिले आहे. पियुष पांडे यांनी लिहिलेले आणि चार प्रकारात तयार करण्यात आलेले हे गाणे अमिताभ बच्चन यांनी गायले आहे. इजिप्तमध्ये हे गाणे चांगलेच लोकप्रिय आहे. ‘ले पंगा’ गाणे इजिप्तमध्ये सोशल मीडियावर ट्रेंडिंग होणे, ही अनोखी आणि आश्चर्यचकीत करणारी बाब असल्याचे बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. यासाठी इजिप्तमधील आपल्या ऑनलाईन चाहत्यांचे त्यांनी आभार मानले आहेत. भारतामध्ये हे गाणे ट्रेंडमध्ये असणे समजण्यासारखे आहे, पण परदेशात असे घडणे हे केवळ ऑनलाईन चाहते आणि त्यांच्या प्रेरणेमुळे शक्य असल्याचे त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. ‘बिग बी’ आपल्या ऑनलाईन चाहत्यांचा ‘एक्सटेंण्डेड फॅमेली’ म्हणून उल्लेख करतात. या आधी अमिताभ बच्चन यांनी ‘होली खेले रघुवीर’, ‘अकेला चलो रे’ आणि ‘पिडली’ इत्यादी गाणी गायली आहेत. आपल्या गायकीमध्ये योगदान देणाऱ्या सर्वांचे अमिताभ बच्चन यांनी आभार मानले आहेत. आपण केलेल्या पुण्य कर्माचे हे फळ असल्याचे ते मानतात. त्यांच्या अभिनय क्षेत्राबाबत सांगायचे झाले, तर ‘वझीर’ हा त्यांचा आगामी चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. त्याचबरोबर ‘अस्त्र फोर्स’मधून ते सुपर हिरोच्या रुपात छोट्या पडद्यावर अवतरणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा