निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या आगामी ‘शुद्धी’ चित्रपटाची सुरूवात होत नसल्याने सदर चित्रपट माध्यमांत चर्चेचा विषय बनला आहे. प्रथम आजारपणामुळे हृतिक रोशन या चित्रपटातून बाहेर पडला, त्यानंतर हृतिकच्या पाठोपाठ करिनाने देखील या चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि आता दीपिका पदूकोणने देखील आपण या चित्रपटात काम करणार आहोत की नाही, या बाबत प्रश्नचिन्ह उभे केले आहे. परंतु, करण जोहर या सर्वाने खचून जाणाऱ्यातला नाही. चित्रपटातील कलाकारांची निवड बाकी असतानाच करणने शुद्धीच्या प्रदर्शनाची तारीख टि्वट केली आहे. “‘शुद्धी’ २५ डिसेंबर २०१५ रोजी प्रदर्शित होईल… प्रमुख कलाकारांची घोषणा लवकरच केली जाईल…,” असे त्याने टि्वट केले आहे. ‘बॅंग बॅंग’ चित्रपटात व्यस्त असल्याने या चित्रपटातून बाहेर पडत असल्याचे हृतिकने एका निवेदनाद्वारे या आधीच जाहीर केले होते. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनद्वारे निर्माण होत असलेल्या करण मल्होत्राच्या ‘शुद्धी’ चित्रपटाची प्रथम डिसेंबर २०१३ मध्ये सुरूवात होणार होती. हृतिक रोशनच्या डोक्यावर करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेमुळे सदर चित्रपट २०१४च्या मध्यापर्यंत पुढे ढकलण्यात आला होता. करण मल्होत्राने पत्नी एकता पाठक मल्होत्राबरोबर सदर चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली आहे. या चित्रपटाविषयी तो अतिशय उत्सुक होता. ७० च्या दशकातील ही-मॅन धर्मेंद्रप्रमाणे दिसण्यासाठी हृतिक शारीरिक मेहनत घेत असल्याचे, तर करिना आपल्या नैसर्गिक शरीरयष्टीवर भर देत असल्याचे त्याने सांगितले होते.

Story img Loader