नाटकात दोन मुख्य कलाकार निश्चित केले जातात. पण एक ज्येष्ठ अभिनेता त्या नाटकात काम करायची इच्छा व्यक्त करतो. त्या अभिनेत्याबरोबर ज्येष्ठ अभिनेत्रीही नाटकात काम करण्यास तयार होते. हे दोन ज्येष्ठ कलावंत काम करत आहेत म्हटल्यानंतर पहिल्यांदा ज्यांची नावे नक्की झालेली असतात ते दोघे कलाकार आपणहून मागे होतात. नाटकाचे काही प्रयोग झाल्यानंतर त्या ज्येष्ठ अभिनेत्याला प्रयोग करणे शक्य नसल्याने नाटकाचे प्रयोग थांबतात. पण चांगले नाटक थांबू नये म्हणून त्या दोघा ज्येष्ठ कलावंतांच्या परवानगीने हे नाटक आता पुढील महिन्यात पुन्हा रंगभूमीवर दाखल होत आहे. सुरुवातीला या नाटकात जे कलावंत काम करणार होते त्यांना घेऊन हे नाटक रंगभूमीवर सादर होणार आहे. गोपाळ अलगेरी यांच्या ‘वेध’ नाटय़संस्थेतर्फे हे नाटक रंगभूमीवर सादर झाले होते आणि आता नव्यानेही त्यांच्याच संस्थेतर्फे सादर होणार आहे. रंगभूमीवर दाखल होणाऱ्या या नाटकाचे नाव आहे ‘के दिल अभी भरा नही’ आणि नाटकात लीना भागवत व मंगेश कदम ही जोडी काम करणार आहे. शेखर ढवळीकर लिखित या नाटकाचे दिग्दर्शन मंगेश कदम यांनीच केले आहे.
या नाटकाच्या निमित्ताने ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले व ज्येष्ठ अभिनेत्री रीमा पहिल्यांदा एकत्र आले होते. नाटकाचे ७४ प्रयोग सादर झाले. विक्रम गोखले यांना घशाच्या त्रासामुळे डॉक्टरांनी बोलण्यावर बंधने घातल्याने तसेच विश्रांतीचा सल्ला दिल्याने त्यांनी काही काळ तरी रंगभूमीवरून अल्पविराम घेत असल्याचे जाहीर केले. साहजिकच या नाटकाचे प्रयोग थांबले.
‘उतारवयातील जोडप्याचे संघर्षमय उत्तरायण’ असे या नाटकाचे वर्णन करता येईल. पती व पत्नीच्या नात्यात नीरगाठी निर्माण होण्यासाठी जे काही प्रसंग निमित्त होतात त्यात त्या प्रसंगांकडे पाहण्याचा भिन्न दृष्टिकोनही कारणीभूत असतो. त्या त्या वेळी यातील तथ्य समजून घेतले नाही किंवा समजावून दिले नाही तर गैरसमज वाढत जातात. आपले तेच खरे असा हेका दोघेही धरू लागले तर मनं दुभंगतात आणि तसेच आयुष्य काढावे लागते, हे या नाटकातून मांडण्यात आले आहे.
या नाटकात पहिल्यांदा लीना भागवत आणि मंगेश कदम हीच जोडी काम करणार होती. पण विक्रम गोखले यांना हे नाटक आवडले आणि त्यांनी नाटकात काम करण्याची इच्छा व्यक्त केली. विक्रम गोखले यांच्यासारखा ज्येष्ठ अभिनेता दीर्घ कालावधीनंतर नाटकात काम करण्यास तयार झाला असल्याने मंगेश कदम यांनी ही भूमिका गोखले यांना करण्यास होकार दिला. गोखले यांच्यासमवेत दिग्गज कलाकार म्हणून रीमा यांचे नाव नक्की झाले. आता या नाटकात काम करण्याची संधी पुन्हा एकदा लीना भागवत व मंगेश कदम यांना मिळाली आहे. नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग १६ जुलैला मुंबईत होणार आहे.