आमिर खानच्या बहुचर्चित ‘तलाश’ चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय अलिबाग नगर परिषदेने घेतला आहे. ‘तलाश’ चित्रपटातून अलिबाग शहर आणि अलिबागकरांची बदनामी केली जात असल्याचा आक्षेप नगर परिषदेने घेतला आहे.
आमिर खानच्या ‘तलाश’ चित्रपटात अलिबागचा उपहासात्मक उल्लेख करण्यात आला आहे. यावर अलिबाग नगर परिषदेने तीव्र आक्षेप घेतला आहे. कारण नसताना जागतिक पातळीवर होणारी बदनामी थांबवा, अशी आग्रही भूमिका आता अलिबागकरांनी घेतली आहे. नगर परिषदेच्या सभागृहात नगराध्यक्षा नमिता नाईक यांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत चित्रपटामधून अलिबागच्या होणाऱ्या नाहक बदनामीबद्दल तीव्र आक्षेप घेण्यात आले. या बैठकीत ‘तलाश’ चित्रपटाच्या दिग्दर्शक निर्माते आणि सेन्सॉर बोर्डाविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हिंदी चित्रपटामधून अलिबागची बदनामी करण्याचा प्रघात कादर खान आणि जितेंद्र यांनी पहिल्यांदा सुरू केला. तेव्हापासून सातत्याने हिंदी चित्रपटांतून अलिबागच्या बदनामीचा प्रघात सुरू आहे. आमिर खानच्या ‘तलाश’ चित्रपटातही हा उल्लेख झाल्याचे पाहायला मिळाले, त्यामुळे यापुढे अलिबागची नाहक बदनामी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा नगराध्यक्षा नमिता नाईक यांनी दिला.
तर अलिबाग शहराला कान्होजी आंग्रेंचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. देशातील पहिल्या आरमाराची उभारणी अलिबागमधूनच झाली आहे, तर जनरल लष्करप्रमुख अरुणकुमार हेदेखील अलिबागचे होते. असे असूनही हिंदी चित्रपटसृष्टीकडून अलिबागची नाहक बदनामी केली जाते आहे. हे आता थांबले पाहिजे, असे मत विरोधी पक्षनेते प्रवीण ठाकूर यांनी व्यक्त केले आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शक, निर्माता आणि सेन्सॉर बोर्डाला कायदेशीर नोटीस काढत असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
‘तलाश’ चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यावर कायदेशीर कारवाई होणार
आमिर खानच्या बहुचर्चित ‘तलाश’ चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय अलिबाग नगर परिषदेने घेतला आहे. ‘तलाश’ चित्रपटातून अलिबाग शहर आणि अलिबागकरांची बदनामी केली जात असल्याचा आक्षेप नगर परिषदेने घेतला आहे.
First published on: 10-12-2012 at 02:19 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Legal notice for talaash